मोदगे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात, भावेश्वरी यात्रा संपली आता स्वच्छतेचे आव्हान - चंदगड लाईव्ह न्युज

02 March 2024

मोदगे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात, भावेश्वरी यात्रा संपली आता स्वच्छतेचे आव्हान

भावेश्वरी मंदिर मोहनगे (ता. हुक्केरी) परिसरात पसरलेल्या कचऱ्याची काही छायाचित्रे

कुदनूर : सी. एल. वृत्तसेवा
      दड्डी- मोहनगे परिसरात भावेश्वरी यात्रेमुळे झालेल्या कचऱ्याची दुर्गंधी सर्वत्र पसरली असून प्रवासी, नागरिक व भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छतेच्या उपायोजना तात्काळ हाती घेण्याची मागणी होत आहे.

  मोदगे (मोहनगे) ता. हुक्केरी येथील भावेश्वरी देवीची माही यात्रा चंदगड, आजरा, गडहिंग्लज सह बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी, बेळगाव आदी तालुक्यातील सर्वात मोठी माघी यात्रा म्हणून ओळखली जाते. रविवार सोमवार दि २५ व २६ फेब्रुवारी रोजी भर यात्रा संपन्न झाली. या काळात लाखो भाविकांनी येथे हजेरी लावली होती. अजुनही  भाविकांची वर्दळ मंदिर परिसरात सुरू आहे. तथापि यात्रा काळात मंदिर परिसरातील दोन तीन किलोमीटर परिसरात पसरलेला नारळाच्या करवंट्या, शेंड्या, प्लॅस्टिक पिशव्या, ग्लास, पत्रावळ्या, बाटल्या आदींच्या कचऱ्यासह हजारो कोंबडी, बकरी कापून त्यांचे अनावश्यक अवयव भाविकांनी गाव परिसरासह नजीकच्या शिवारात तसेच घटप्रभा नदीकाठ व पात्रात इतस्ततः फेकून दिल्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.  
       यामुळे परिसरात येणारे भाविक, ग्रामस्थ, प्रवासी यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथून प्रवास करताना नाक मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. आता लाखो भाविकांनी केलेला शेकडो टन कचरा उचलून साफसफाई करण्याचे  आव्हान येथील व्यवस्थापनासमोर असून हे काम हाती घेऊन तात्काळ पूर्ण करण्याची मागणी होत आहे.  हा कचरा व दुर्गंधी यामुळे रोगराई पसरू नये यासाठी दक्षता पाळून या पुढील काळात कचऱ्याचे व्यवस्थापन होणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment