प्रतिमापूजन करताना मान्यवर व उपस्थित
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
"फुले दांपत्याने प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून समाजकार्यास अवघे आयुष्य समर्पित केले. सनातनी प्रवृत्तीच्या लोकांनी टाकलेला दबाव झुगारून त्यांनी झुंजारवृत्तीने कार्य केले. त्यांनी शिक्षण प्रसार, विधवाविवाह, पुनर्विवाह, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक ऐक्य व समता यासाठी अत्यंत मौलिक स्वरूपाचे योगदान दिले. डॉ. आंबेडकर म. फुलेंना गुरुस्थानी मानत. त्यांनी संविधान म. फुलेंना समर्पित करून आदर प्रकट केला. समाज परिवर्तनास योग्य दिशा व गती देण्याचा या दोन्ही महापुरुषांनी जो प्रयत्न केला. त्यामुळेच आपली लोकशाही परंपरा टिकून राहिली. "असे प्रतिपादन प्रा. एम. एस. दिवटे यांनी केले. ते येथील र. भा. माडखोकर महाविद्यालयात प्राधापक प्रबोधिनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या म. फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीदिन कार्यक्रमात बोलत होते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रभारी प्राचार्य डॉ. एम. एम. माने यांनी म. फुले व डॉ. आंबेडकर यांनी सामाजिक समतेसाठी अविरत प्रयत्न केले व पुरोगामी विचारांचा पुरस्कार करून भारतीय लोकशाहीचा पाया घातला असे मत व्यक्त केले. प्रारंभी म. फुलेव डॉ. आंबेडकर यांचा प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. ए. डी. कांबळे यांनी तर आभार डॉ. टी. एम. पाटील यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment