कागणीपासून सुरू असलेले कागणी ते राजगोळी खुर्द रस्त्याचे काम, जुना रस्ता उकरून पुन्हा करण्यात येत आहे. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कागणी ते राजगोळी खुर्द हा १० किमी लांबीचा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. बांधकाम विभागामार्फत दुरावस्थेतील हा रस्ता खडीकरणासह डांबरीकरणाचे काम काम सुरू आहे. तथापि गावागावात रस्त्याकडेची अतिक्रमणे हटवूनच रस्ता करावा अशी मागणी प्रवासी, वाहनधारक व ग्रामस्थांतून होत आहे.
चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वाधिक वर्दळीचा हा महत्त्वाचा रस्ता आहे. कोवाड- बेळगाव मार्गाला थेट हत्तरगी येथे पुन्हा बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. कागणी गावापासून हा जोड रस्ता असून चंदगड तालुक्यातील कालकुंद्री, कुदनूर ही सर्वाधिक लोकसंख्येची गावे याच मार्गावर येतात. मार्गावर अनुक्रमे कागणी, कालकुंद्री, कुदनूर, तळगुळी, राजगोळी बुद्रुक, राजगोळी खुर्द अशी गावे आहेत. राजगोळी खुर्द च्या पुढे दड्डी नजीक घटप्रभा नदीपर्यंत रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण झाले आहे. तथापि हा १० किमी लांबीचा टप्पा गेली अनेक वर्षे रुंदीकरण व मजबुती करणापासून वंचित राहिला आहे. या मार्गावरील प्रत्येक गावात रस्त्यालगत वर्षानुवर्षे पडलेले दगड, विटा, वाळू, खडी असे बांधकाम साहित्य, बंद पडलेल्या चार चाकी गाड्या, ट्रक, ट्रॅक्टर, ट्रॉली, पार्क केलेली वाहने, लाकुडफाटा याचा नेहमी वाहतुकीस अडथळा होत असतो. त्यातच काही ठिकाणी गवतगंज्या, शेणाचे ढिगारे यांची भर पडलेली आहे. तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी दोन्ही बाजूने रस्ता कोरुन अतिक्रमण केल्यामुळे दोन गाड्या एकाच वेळी जाऊ शकतील इतकीही रस्त्याची रुंदी नाही.
सध्या रस्त्याचे खडीकरण डांबरीकरणाचे काम बांधकाम विभागाने हाती घेतले असले तरी वरील अतिक्रमणे काढून घेण्यास काही लोक विरोध दर्शवत आहेत. अशा ठिकाणी प्रसंगी पोलीस खात्याच्या मदतीने अतिक्रमणे काढून रुंदीकरणासह रस्ता करावा अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment