श्रीकांत पाटील 'महात्मा गांधी राष्ट्रहित सेवा गौरव' पुरस्काराचे मानकरी - चंदगड लाईव्ह न्युज

18 May 2024

श्रीकांत पाटील 'महात्मा गांधी राष्ट्रहित सेवा गौरव' पुरस्काराचे मानकरी

 

श्रीकांत सुबराव पाटील

चंदगड : सी एल वृत्तसेवा

   विद्या मंदिर जक्कनहट्टी (ता. चंदगड) येथील अध्यापक श्रीकांत सुबराव पाटील (मुळ गाव - म्हाळेवाडी, ता. चंदगड) हे 'महात्मा गांधी राष्ट्रहित सेवा गौरव' पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. इंटरनॅशनल रिसर्च पब्लिकेशन ऑफ बिझनेस मॅनेजमेंट संचलित 'युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड' संस्थेच्या वतीने जाणाऱ्या 'एशिया इंडो समिट' अंतर्गत हा पुरस्कार दिला जातो. नुकत्याच जाहीर झालेल्या या पुरस्काराचे वितरण उद्या रविवार दि. १९ मे २०२४ रोजी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे सकाळी ११ वाजता होणाऱ्या संयुक्त कार्यक्रमात होणार आहे. यावेळी मराठी, हिंदी चित्रपट सृष्टी व दूरदर्शन मालिकेतील ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

  सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाटील यांनी आपल्या एकूण सेवेपैकी १७ वर्षे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अतिदुर्गम भागात व नंतरची सुमारे २१ वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात मलतवाडी, चिंचणे व जक्कनहट्टी या डोंगराळ व दुर्गम गावात बजावली आहे. या काळात राष्ट्रहित दृष्टीसमोर ठेवून आपल्या शैक्षणिक सेवेत मेहनत, सचोटी व चांगुलपणा ही जीवनातील तत्त्वे सांभाळत विद्यार्थी घडवण्याचे पवित्र कार्य केले आहे. स्वतः उत्कृष्ट हॉलीबॉल व गोळाफेक खेळाडू असल्याने विद्यार्थ्यांना क्रीडा विषयक मार्गदर्शन करण्याबरोबरच सार्वत्रिक निवडणूक, जनगणना, केंद्रस्तरीय मतदान अधिकारी, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, तंबाखू मुक्त शाळा व सहशालेय उपक्रमात अग्रेसर राहून कार्य केले आहे. त्यांची जक्कनहट्टी शाळेतील विद्यार्थिनी प्रियंका पाटील हीची नुकत्याच झालेल्या एमपीएससी परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. शैक्षणिक, सामाजिक व क्रिडा क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन श्रीकांत पाटील यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 

  पुरस्कार कामी त्यांना चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांचे मार्गदर्शन व कोवाड केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षकांचे सहकार्य लाभले. पुरस्काराच्या निमित्ताने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


No comments:

Post a Comment