'चंदगड' मतदार संघात 'गृह मतदान', ७०० मतदारांनी बजावला बॅलेट पेपरवर मतदानाचा हक्क....! - चंदगड लाईव्ह न्युज

03 May 2024

'चंदगड' मतदार संघात 'गृह मतदान', ७०० मतदारांनी बजावला बॅलेट पेपरवर मतदानाचा हक्क....!

 

कालकुंद्री येथे गृह मतदान (होम वोटिंग) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आलेले पथक सोबत पोलीस पाटील व तलाठी

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
     'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४' च्या अनुषंगाने लोकसभा मतदारसंघ '४७ कोल्हापूर' अंतर्गत '२७१ चंदगड' विधानसभा मतदारसंघातील 'गृह मतदान' गेल्या दोन दिवसात पूर्ण केल्याची माहिती तहसील कार्यालय चंदगड यांच्याकडून देण्यात आली आहे. बी एल ओ व पर्यवेक्षकांमार्फत शोधण्यात आलेल्या चंदगड मतदार संघातील ७०० वृद्ध व दिव्यांग मतदारांनी याचा लाभ घेतला.
   निवडणूक आयोगामार्फत यंदा नवीनच राबविण्यात आलेल्या ८५ वर्षांवरील तसेच अपंग मतदारांच्या सोयीसाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. शारीरिक अक्षमतेमुळे हे मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाने राबवलेल्या या उपक्रमाबद्दल मतदारांतून समाधान व्यक्त होत आहे. वरील सर्व मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांचे बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी चंदगड मतदार संघात २५ पथके तैनात करण्यात आली होती. यात मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक पोलीस, व्हिडिओग्राफर, शिपाई यांचा समावेश होता. पथक क्रमांक २४ मार्फत कालकुंद्री येथे येथील १२ मतदारांचे मतदान पूर्ण करण्यात आले. यावेळी पथकासोबत गावकामगार पोलीस पाटील, तलाठी, बीएलओ, पर्यवेक्षक यांची उपस्थिती होती. दि. १ मे रोजी आजरा व गडहिंग्लज तर २ मे रोजी चंदगड तालुक्यातील गृह मतदान पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मतदान अधिकाऱ्यांमार्फत त्या मतदारापर्यंत जाऊन प्रत्यक्ष मतदान करून घेतल्यामुळे यापूर्वी अशा मतदारांना आपल्या वाहनातून आणून मतदान करून घेतले जायचे. यातून होणाऱ्या संभाव्य बोगस मतदानाला आळा बसला आहे.
     गृह मतदानाबरोबरच एकूणच मतदान प्रक्रिया पार पाडण्यात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी गडहिंग्लज चे प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने, चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण व गडहिंग्लज चे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. 

 

No comments:

Post a Comment