प्रा. श्रीमंत कोकाटे यांचे स्वागत करताना मराठा सेवा संघ बेळगावचे पदाधिकारी |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
'मराठा सेवा संघ' बेळगाव शाखेच्या वतीने मराठा सभागृह, गणेश कॉलनी, संभाजीनगर वडगाव- बेळगाव येथे मराठा मुलांसाठी मराठा बालकल्याण व स्पर्धा परीक्षा वर्ग सुरू करण्यात येत आहेत. हे वर्ग दर रविवारी सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत सुरू राहतील अशी माहिती मराठा सेवा संघाचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष किरण मा. धामणेकर यांनी दिली आहे.
प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन इतिहास संशोधक डॉ श्रीमंत कोकाटे व चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजनानंतर मराठा सेवा संघाचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष किरण धामणेकर यांनी प्रास्ताविक केले. या प्रशिक्षण वर्गात उच्च अभियांत्रिकी वैद्यकीय तसेच IIT, JEE, NEET, KCET, UPSC, MPSC आदी सर्व स्पर्धा परीक्षा व परदेशातील इतर उच्च अभ्यासक्रमाचे मूलभूत ज्ञान तज्ञ मार्गदर्शकांमार्फत देण्यात येणार आहे. या क्षेत्रातील ज्ञान असलेल्या मराठा समाजातील तज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शनासाठी पुढे यावे असे आवाहनही यावेळी मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आले. इयत्ता नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश तसेच सामान्य ज्ञान विषयी मार्गदर्शन करण्यात येईल असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
उपस्थित पाहुण्यांचा सत्कार मराठा सेवा संघाचे बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष नारायण सांगावकर, संचालक मनोहर घाडी आदींच्या हस्ते करण्यात आला. मराठा व्यावसायिक ग्रुप ॲडमिन प्रमोद गुंजीकर, सांगलीचे प्रसिद्ध उद्योजक चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली. इतिहास संशोधक, व्याख्याते, प्राध्यापक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी मराठा समाजाने जत्रा यात्रा, लग्न समारंभ आदींवर होणारा अवाजवी खर्च टाळून शिक्षणाचे महत्त्व समजावून घ्यावे. हाच पैसा मुलांच्या शिक्षणावर त्यांना उद्योग काढून देण्यासाठी उपयोगात आणावा. असे सांगताना धार्मिक कर्मकांडात न गुंतता विज्ञानवादी दृष्टिकोन बाळगून उद्योगाकडे वळावे, समाजातील तरुणी आणि स्त्रियांना सन्मान द्यावा असे विचार व्यक्त केले.
यावेळी मधु मचंडी, भरतेश पाटील, शिवाजी जाधव, अनंत वाळके, पी वाय गोरल, आनंद काटकर, सतीश पाटील, दीपक कोले, अनिल हुंदरे, नारायण केसरकर, श्रीधर जाधव, बबन गुरव, बापू जाधव, बाजीराव मन्नुरकर, शिवम शिनोळकर आदिंसह मराठा समाज बांधव व मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. नारायण सांगावकर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment