अन्याय निवारणासाठी हेरे येथील चव्हाण बंधूंचे चंदगड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण - चंदगड लाईव्ह न्युज

31 May 2024

अन्याय निवारणासाठी हेरे येथील चव्हाण बंधूंचे चंदगड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण

 

चंदगड तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेले हेरे येथील चव्हाण कुटुंबीय. 

चंदगड : सी एल वृत्तसेवा    

    हेरे (ता. चंदगड) येथील रहिवाशी राजाराम अर्जुन चव्हाण, अशोक अर्जुन चव्हाण, विलास अर्जुन चव्हाण यांना श्रावण सिताराम चव्हाण व शंकर सिताराम चव्हाण यांच्याकडून वादग्रस्त जमिनीवर घरे बांधून विनाकारण त्रास दिला जात आहे. याला चंदगड पोलिसांची साथ लाभत आहे. यातून आपल्याला न्याय मिळावा यासाठी तिन्ही बंधूंनी कुटुंबीयांसमवेत चंदगड तहसील कार्यालयासमोर दि ३१/०५/२०२४ पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.



       वरील दोन्ही कुटुंबीयांमध्ये गट क्रमांक ७१ मधील ५१ आर या शेतजमिनी बाबत कोर्टात वाद सुरू आहे. या जमिनीच्या वाटण्या झालेल्या नसतानाही रस्त्यालगत च्या जमिनीवर शंकर चव्हाण यांनी घर बांधले आहे. तर श्रावण चव्हाण घर बांधत आहे. याला तहसील कार्यालय कडून १ मार्च २०२४ रोजी बांधकाम करू नये असा आदेश असतानाही बांधकाम थांबवलेले नाही. त्यामुळे आपले मोठे नुकसान होत आहे. अशी उपोषणकर्त्यांची तक्रार आहे.  ही बाब न्यायप्रविष्ठ असून याप्रकरणी कोर्ट कमिशनही नेमले आहे. तथापि संबंधितांकडून कोर्टाचीही दिशाभूल सुरू आहे. याबाबत चंदगड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेले असता आपल्यावरच खोट्या तक्रारी दाखल करून कारवाई केली जात आहे. असा आरोप करून या सर्व प्रकरणी आपल्याला न्याय मिळावा या मागणीसाठी संबंधितांनी उपोषण सुरू केले आहे.   या आंदोलनाच्या प्रती माहितीसाठी जिल्हाधिकारी कोल्हापूर, पोलीस अधीक्षक कोल्हापूर, उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज, डीवायएसपी गडहिंग्लज, पोलीस निरीक्षक चंदगड, अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी चंदगड आदींना देण्यात आलेल्या आहेत.    

No comments:

Post a Comment