मयत निवृत्त जवान विजय शिनोळकर |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
सध्या वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत. उकाड्या पासून काही काळ सुटका मिळवण्यासाठी अनेकजण नदी, विहीर, तलावात आंघोळ किंवा पोहण्यासाठी जातात. तथापि अनोळखी नदी, तलाव, विहिरी, धरणातील पाणी व खोलीचा अंदाज न आल्यामुळे तसेच पोहण्याची सवय नसल्यामुळे अनेकांना पाण्यात बुडून आपले प्राण गमवावे लागत आहेत. अशा घटनांची संख्या उन्हाळी सुट्टी काळात कमालीची वाढली आहे.
अशीच घटना काल चंदगड तालुक्यातील करेकुंडी येथे घडली. उष्म्याने हैराण झाल्याने गारवा मिळवण्यासाठी गावाजवळच्या लघुपाटबंधारे बंधारे पाझर तलावात आंघोळीसाठी गेलेल्या निवृत्त जवान व दोन शाळकरी मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
याबाबत घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, करेकुंडी येथील सेवानिवृत्त जवान विजय विठोबा शिनोळकर (वय ४५) हे दोन वर्षांपूर्वी भारतीय सैन्यातून निवृत्त झाले होते. ७ मराठा मध्ये ते सेवेत होते. त्यांच्याकडे (आसगाव, ता चंदगड) येथील साडूची मुलगी कु. चैतन्या नागोजी गावडे (वय १२) उन्हाळी सुट्टी निमित्त राहण्यास आली होती. तिच्यासह आपल्या भावाची मुलगी कु समृद्धी अजय शिनोळकर वय १२ रा. करेकुंडी (सध्या राहणार वैताकवाडी, ता चंदगड) या दोघींसह ते गावानजीकच्या पाझर तलावात दि ६ मे २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आंघोळ व पोहण्याच्या हेतूने गेले होते. दोन्ही मुली आंघोळ करत असताना दमछाक झाल्याने अचानक पाण्यात बुडू लागल्या तथापि त्यांना वाचवण्यासाठी गेलेले विजय हे पाण्यातील गाळात अडकून बुडाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सायंकाळी ६.३० वाजता तिघांचे कपडे तलावाच्या काठावर एका ग्रामस्थाला दिसले. यानंतर ते पाण्यात बुडाल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला व पाण्यातून बाहेर काढले. तिघांनाही तात्काळ चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयात नेले तथापि उपचारा पूर्वीच मृत्यू झाले होते. या घटनेने करेकुंडी गावावर शोककळा पसरली असून घटनास्थळी नातेवाईकरांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून याबाबतची फिर्याद महेश गणपती हेमोते (रा. जंगमहट्टी) यांनी पोलिसात दिली. चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ कोगेकर हे अधिक तपास करत आहेत. दरम्यान तिन्ही मृतदेह चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment