अर्धवट अवस्थेत रखडलेला पारगड मोरले रस्ता |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
वन विभागाकडून मुदत वाढ न मिळाल्याने गेली ४-५ वर्षे रखडलेल्या पारगड ते मोर्ले या ८ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी वन विभागाकडून मुदतवाढ मिळाल्याने रस्ता कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. अशी माहिती पारगड येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर खंडोजी शेलार यांनी दिली आहे. या प्रश्नी शेलार यांच्यासह मोर्ले येथील ज्ञानेश्वर चिरमुरे, महादेव गवस, सुजाता मणेरीकर आदींनी आमरण उपोषणातून अनेक वेळा आवाज उठवला होता. चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एल तथा चंदगड लाईव्ह न्यूज चॅनेल गेली ४-५ वर्षे या प्रश्नी बातम्या व व्हिडिओ च्या माध्यमातून सतत आवाज उठवला होता. याबद्दलही ग्रामस्थांनी चंदगड लाईव्ह न्यूज चॅनलचे आभार मानले आहेत. हे काम बांधकाम विभागाने आता लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.
पारगड- मोर्ले रस्ता झाल्यास तो कोल्हापूर व कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्याला सिंधुदुर्ग जिल्हा व गोवा राज्याशी जोडणारा सर्वात जवळचा व सुलभ मार्ग ठरणार आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यास पंचक्रोशीतील तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील या शक्यतेने गेली तीन चार दशके पंचक्रोशीतील ग्रामस्थ याकामी प्रयत्नशील होते. हा रस्ता व्हावा यासाठी चंदगड चे माजी आमदार व्ही के चव्हाण-पाटील, व्ही बी पाटील, नरसिंग गुरुनाथ पाटील, मंत्री बाबासाहेब कुपेकर, भरमू सुबराव पाटील यांच्यासह कोकणातील आमदार व मंत्र्यांचे योगदानही तितकेच महत्वाचे ठरले आहे. तथापि शासनाच्या लाल फितीत अनेक वर्षे हा प्रश्न अडकून पडला होता. गेल्या काही वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंत्री दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली आदिंचा पाठपुरावा तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व पालकमंत्री रवींद्र चव्हाण आदी मंत्र्यांच्या सहकार्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला. कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या समन्वयातून ५ वर्षांपूर्वी प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरू झाले. तथापि वन विभागाने दिलेल्या मुदतीत बांधकाम विभागाने काम पूर्ण न केल्याने वन विभागाने उर्वरित कामास मनाई केली. परिणामी गेली चार वर्षे रस्त्याचे काम पुन्हा रखडले. हे काम पुन्हा मार्गी लावावे व रस्ता तात्काळ पूर्ण करावा यासाठी पारगड येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार यांनी पुढाकार घेतला. मोर्ले येथील ज्ञानेश्वर शेलार, यांच्यासह माजी सरपंच महादेव गवस, घोटगेवाडीच्या माजी सरपंच सुजाता मणेरीकर, यांच्यासह प्रथमेश गवस, हरीश गवस, प्रकाश नाईक, अजित सरवणकर, पंकज गवस आदी शिलेदारांना घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड व दोडामार्ग तर वनविभागाच्या चंदगड व सावंतवाडी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. या आंदोलनांना मार्गावरील हेरे, वाघोत्रे, नामखोल, मिरवेल, पारगड, मोर्ले, घोटगेवाडी पासून दोडामार्ग पर्यंत येणाऱ्या सर्व गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांची साथ लाभल्याने पुन्हा हा प्रश्न मार्गी लागला आहे.
वन विभागाच्या नागपूर कार्यालयाकडून याकामी नुकतीच मुदतवाढीचे पत्र प्राप्त झाले असून रस्त्याचे उर्वरित काम तात्काळ पूर्ण करून घेण्याबद्दल सुचवले आहे. चार वर्षांपूर्वी रस्ता सपाटीकरण, रुंदीकरण, कच्चे खडीकरण, मोऱ्यांचे बांधकाम अशी कामे झाली असली तरी काम रखडल्यामुळे पुन्हा बरेच नुकसान झाले आहे. आता पुन्हा मनाई येण्यापूर्वी ठेकेदाराने काम हाती घेऊन पूर्ण करावे अशी मागणी केली आहे. दरम्यान या प्रश्नाशी काही संबंध नसलेल्या व्यक्ती मुदतवाढीचे श्रेय घेऊ पाहत आहेत त्यांनी फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असे शेलार यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment