बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कोवाडचे मॅनेजर कुलदीप चौगुले यांची पदोन्नती बदली - चंदगड लाईव्ह न्युज

18 June 2024

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कोवाडचे मॅनेजर कुलदीप चौगुले यांची पदोन्नती बदली



कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
   बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कोवाडचे मॅनेजर कुलदीप चौगुले यांची नुकतीच पदोन्नतीने रत्नागिरी येथे बदली झाली आहे. त्यानिमित्त त्यांना कोवाड व्यापारी संघटना व ग्राहकांच्या वतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
     सन २०१९ च्या प्रलयंकारी महापुरानंतर कोवाड बाजारपेठेतील शेकडो व्यापारी तसेच कोवाड परिसर व तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडून गेले होते. अशा काळात व्यापारी वर्गाला व्यवसायात पुन्हा उभे करण्यासाठी एका चांगल्या बँक अधिकाऱ्यांची आवश्यकता होती. अशावेळी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कोवाड मध्ये कुलदीप चौगुले हे शाखाधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांनी शाखेचा कार्यभार सांभाळल्याबरोबर अनुभवी असिस्टंट मॅनेजर किरण सौदागर यांच्या सहकार्याने शाखेची घोडदौड सुरू केली. व्यापारी व शेतकरी गरजू नागरिकांना विविध कर्जे देण्यात आघाडी घेतली. तशी आपल्या कौशल्यपूर्ण वर्तनातून वसुलीही चांगली ठेवली यामुळे शाखेचे कार्य ग्राहकभिमुख व उठावदार होऊ लागले. यामुळेच सन २०२२ मध्ये देशातील ग्रामीण विभागात कार्यरत असलेल्या साडेसहाशे शाखांमध्ये कोवाड शाखेने दुसरा क्रमांक पटकावला होता.
   कुलदीप चौगुले यांच्या कार्यकाळात  कोवाड शाखेचे व्यवहार ८१ कोटी वरून ११६ कोटी पर्यंत पोहोचले यातच त्यांची त्यांच्या कार्याची प्रचिती येते. त्यांना या कामी  तुर्केवाडी शाखेतून नुकतेच सेवानिवृत्त झालेले असिस्टंट मॅनेजर किरण सौदागर यांच्यासह कॅशियर संदीप पाटील, क्लार्क शहाजी कांबळे, शेती अधिकारी सुधीर पाटील, दप्तरी कोरवी, राजू देसाई, परसू कांबळे आदी स्टाफचे मोलाचे सहकार्य लाभले .
    चौगुले यांची मागील वर्षी अन्यत्र बदली झाली होती, तथापि कोवाड येथील व्यापारी मंडळ व ग्राहकांनी आंदोलन करून ही बदली वरिष्ठ कार्यालयाला रद्द करायला भाग पाडले होते. तथापि यावेळी त्यांची पदोन्नती बदली झाल्याने त्यांना सर्वांनी हसतमुख शुभेच्छा दिल्या. बँक कार्यालयात आज दि १८/०६/२०२४ रोजी सायंकाळी पाच वाजता कुलदीप चौगुले यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. 
    सदिच्छा निरोप समारंभाचे प्रास्ताविक व्यापारी संघटनेचे पदाधिकारी गुलाब पाटील यांनी केले. कोवाडचे माजी केंद्र मुख्याध्यापक व पत्रकार श्रीकांत पाटील यांनी शाखाधिकारी चौगुले यांच्या काळात कोवाड परिसरातील प्राथमिक शिक्षकांचे पगार बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये करून विविध सुविधा प्रदान केल्याचे सांगितले. यावेळी नरसिंह पाटील आदींनी भाषणातून शुभेच्छा दिल्या. यावेळी नागोजी पाटील, सचिन पाटील, महेश हल्ल्याळी, सचिन गजरे उत्तम मुळीक, रमाकांत कोकितकर, डॉ एम डी पाटील, सतीश निर्मळकर, विनायक पोटेकर आदींसह बाजारपेठेतील व्यापारी उपस्थित होते. विक्रम पेडणेकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment