वनपाल दत्ता पाटील यांच्या 'मन फुलपाखरू' कविता संग्रहास 'कदंब' पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

12 June 2024

वनपाल दत्ता पाटील यांच्या 'मन फुलपाखरू' कविता संग्रहास 'कदंब' पुरस्कार

कोल्हापूर येथे श्रीराम पचिंद्रे यांच्या हस्ते 'कदंब' पुरस्कार स्वीकारताना दत्ता पाटील सोबत कदंब महोत्सव समितीचे पदाधिकारी व मान्यवर

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
         कदंब महोत्सव समिती कोल्हापूर यांच्या वतीने दिला जाणारा सन २०२४ चा 'कदंब पुरस्कार' वनपाल दत्तात्रय हरी पाटील (घाटकरवाडी, ता. आजरा) यांच्या 'मन फुलपाखरू' या कविता संग्रहास प्राप्त झाला आहे. कदंब वृक्षाच्या नावाने दिला जाणारा हा देशातील पहिलाच पुरस्कार आहे. पुरस्काराचे वितरण कोल्हापूर येथील कार्यक्रमात दैनिक पुढारीचे संपादक श्रीराम ग. पचिंद्रे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
        वनविभागात अधिकारी म्हणून कार्यरत असताना एका शेतकरी कुटुंबातील कवी मनाच्या दत्ता पाटील यांना जंगलात वावरताना तेथील चराचरातील असंख्य जीवाची भाषा कळत असावी. म्हणूनच त्यांनी आपल्या लेखणीतून उतरलेल्या 'मन फुलपाखरू' या काव्यसंग्रहातून त्याची प्रचिती येते. हा काव्यसंग्रह माती, पाऊस, निसर्ग, मानवी प्रेम, भक्ती, गझल, रूपक अशा विविध अंगांनी व रंगांनी नटलेला आहे. 
       
पुरस्कार वितरणानंतर आपल्या शेतकरी कुटुंबियांसमवेत दत्ता पाटील

     सध्या कोकणातील सावंतवाडी तालुक्यात वनपाल म्हणून कार्यरत असलेल्या तसेच वन विभागातील (महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट) एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दत्ता पाटील यांना महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट कार्याबद्दल यापूर्वीच 'सुवर्णपदक' देऊन गौरव केला आहे. जंगलात राहूनही त्यांनी तेथील वृक्ष- वेली, प्राणी, पक्षी, फुलपाखरे यांच्याशी केलेली मैत्री त्यांच्या कवितेतून आपल्याला पाहायला व वाचायला मिळते. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून गौरव झाल्यानंतर साहित्य क्षेत्रातूनही त्यांच्या दर्जेदार लेखणीची दखल 'कदंब' पुरस्काराच्या निमित्ताने घेण्यात आली आहे. याबद्दल त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
        पुरस्कार प्रदान कार्यक्रमास साहित्य क्षेत्रातील मान्यवर, साहित्यप्रेमी नागरिक, कुटुंबातील सर्व सदस्य व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 

No comments:

Post a Comment