पोल्ट्रीची नासधूस केल्याच्या रागातून हडलगे येथे विद्यार्थ्यांना मारहाण...! एकजण ताब्यात, प्रकरणाची सखोल चौकशीची ग्रामस्थांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

12 June 2024

पोल्ट्रीची नासधूस केल्याच्या रागातून हडलगे येथे विद्यार्थ्यांना मारहाण...! एकजण ताब्यात, प्रकरणाची सखोल चौकशीची ग्रामस्थांची मागणी

 


नेसरी /सी एल वृत्तसेवा
      हडलगे (ता. गडहिंग्लज) येथे पोल्ट्रीची नासधूस केल्याच्या रागातून एका पोल्ट्री चालकांने तीन अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार अशोक शिवाजी तेऊरवाडकर (रा. हडलगे)  यांनी नेसरी पोलिसांत दिली आहे. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 
    याबाबत घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, हडलगे येथे नेसरीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत मायाप्पा विष्णू तेऊरवाडकर यांच्या मालकीची पोल्ट्री आहे. ही पोल्ट्री गावातीलच विजय सुभाष कुंभार (वय ३० वर्षे) यांना भाडेतत्वावर चालवण्यास दिली आहे. या पोल्ट्रीच्या पाण्याच्या टाकीमध्ये फिर्यादीचा १२ वर्षाचा मूलगा, पुतण्या वय १३ वर्ष व गावातील आणखी एक १२ वर्षाचा मुलगा यांनी पाईप क्लिनिंगचे केमिकल टाकून व पोल्ट्रीमध्ये पाणी सांडून नुकसान केल्याच्या कारणावरून त्यांना  दोरीने बांधून  मारहाण केल्याची तक्रार पोलीसात करण्यात आली आहे. यानुसार नेसरी पोलिसात गु र क्र 62 /2024 , भादविस कलम 324 , 323 , 342 सह बाल न्याय बालकाची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानुसार संशयीत आरोपी विजय कुंभार याला नेसरी पोलिसानी ताब्यात घेतले असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक करत आहेत.

 घटनेत राजकारण आणल्याचा संशय 
   सदर घटना घडल्यानंतर ही घटना पालकांना बोलावून घेऊन प्रमुख ग्रामस्थांसमोर स्थानिक पातळीवर मिटवण्यात आली होती. पण या मिटवण्याच्या मिटींग मधील व्हीडीओ राजकीय द्वेशातून व्हायरल केल्याने पुन्हा हे प्रकरण पेटले असल्याची चर्चा ग्रामस्थांत रंगली आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकाराच्या मुळाशी जाऊन तपास करावा अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे. 

No comments:

Post a Comment