वाहनधारकांसाठी ब्रेकींग न्युज - चंदगड तालुक्यातील तिलारी घाट ३१ ऑक्टोबर अखेर अवजड वाहतुकीसाठी बंद - जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांचा आदेश - चंदगड लाईव्ह न्युज

20 June 2024

वाहनधारकांसाठी ब्रेकींग न्युज - चंदगड तालुक्यातील तिलारी घाट ३१ ऑक्टोबर अखेर अवजड वाहतुकीसाठी बंद - जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांचा आदेश

 

संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : 

          चंदगड तालुक्यात तसेच तिलारी घाटामध्ये पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी होत असल्याने घाटातील ब-याच ठिकाणी रोडच्या बाजुचे संरक्षक कठडे जीर्ण व नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे घाटामध्ये अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घाटामधुन एस.टी. वाहतुक सुध्दा सुरु आहे त्यामुळे एस.टी. बसचा एखादा उपघात होवून अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. चंदगड तालुक्यातील परिते-गारगोटी-गडहिंग्लज-नागणवाडी-चंदगड- हेरे मोटणवाडी फाटा- कळसगादे कोदाळी- भेडशी ते राज्य हद्द रस्ता रा.मा. 189 किमी 155/00 ते 163/00 मधील तिलारी घाट मोटर वाहन कायदा 115 व 116 अन्वये जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी अवजड वाहतुकीसाठी दिनांक 31 ऑक्टोबर 2024 अखेर बंद करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. वाहतुक सुरक्षा उपाययोजनेनुसार वाहतुक नियंत्रीत करण्याचे आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत.

      चंदगड पोलीस ठाणे हद्दीतून बेळगांव, शिनोळी, पाटणे फाटा, हलकर्णी, नागनवाडी, चंदगड, हेरे, मोटणवाडी, तिलारीनगर या मार्गावरुन येणारी वाहतुक राज्यमार्ग क्र. 189 या मार्गावर असणा-या तिलारी घाटातून अवजड वाहनांची वाहतुक मोठ्या प्रमाणात होते. हा घाट हा खुपच अरुंद असल्याने घाटामध्ये वारंवार अपघात घडत असतात. घाट अवजड वाहतुकीस अत्यंत धोकादायक असुन घाटातील तीव्र चढ-उतारामुळे रस्त्यांच्या वळणांवर वाहनांचा टर्न बसत नाही. त्यामुळे घाटामध्ये अनेक मोठे अपघात झाले आहेत. घाटामध्ये अवजड वाहतुकीमुळे तीव्र वळणांवर वाहन अडकून राहते व वाहन काढण्यासाठी क्रेन घेवून जाणे सुध्दा अवघड होते. मोठ्या क्रेनचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यास क्रेनचा सुध्दा अपघात झालेल्या घटना घडल्या आहेत. तसेच बेळगांव, कर्नाटक येथुन गुगल मॅपवर गोव्यास जाणारा जवळचा रस्ता तिलारी घाटातुन दाखवतो. त्यामुळे वाहन चालक या घाटातून प्रवास करतात. परंतु घाटाचा अंदाज चालकाला येत नाही. गुगल मॅपवरुन परराज्यातुन येणाऱ्या अवजड वाहनांवरील चालक हे या घाटाचा अंदाज नसतानाही अवजड वाहन तिलारी घाटातून घेवून जाण्याचे धाडस करतात त्यामुळे अपघाताच्या घटना व वाहने घाटामध्ये अडकुन राहण्याच्या घटना घडतात. त्यामुळे मोटरसायकल व इतर चारचाकी वाहनांच्या वाहतुकीस अडथळा होतो. 

        तिलारी घाटातुन होत असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग आंबोली घाट तसेच कर्नाटक राज्यातील चोर्ला घाट असे दोन पर्यायी मार्ग आहेत. संकेश्वर-गडहिंग्लज-आजरा- आंबोली ते बांदा हा महामार्ग क्र. 548 एच या महामार्गाचे काम प्रगतीपथावर असून 30 जून 2024 अखेर महामार्गाचे काम पूर्ण होणार आहे. तसेच उत्तुर-आजरा-आंबोली मार्गे सावंतवाडी ते गोवा अशी वाहतुक देखील या मार्गावरुन होऊ शकते. तरी पर्यायी महामार्गावरुन अवजड वाहतुक वळविण्यास हकरत नाही. तिलारी घाटामध्ये घाटाच्या सुरुवातीस व शेवटी हा घाट अवजड वाहतुकीकरीता बंद करण्यात आल्याबाबत फलक लावावेत. तसेच अवजड वाहतुक तिलारी घाटामधुन जाऊ नये याकरीता घाटाच्या सुरुवातीस व शेवटी कमी उंचीचे हॉरिझॉटल बार लावण्यात यावेत, असेही या अधिसुचनेत नमुद करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment