कोवाड स्टॅन्ड ते किणी फाटा रस्ता बनणार ५६ फुटी हमरस्ता, कामाची गती वाढवण्याची नागरिकांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

19 June 2024

कोवाड स्टॅन्ड ते किणी फाटा रस्ता बनणार ५६ फुटी हमरस्ता, कामाची गती वाढवण्याची नागरिकांची मागणी

  

कोवाड स्टॅन्ड ते किणी फाटा रस्त्याचे सुरू असलेले रस्ता रुंदीकरण व गटारे बांधकाम

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        गेल्या काही वर्षात अनेक समस्यांनी वेढलेल्या कोवाड बस स्टँड ते किणी फाटा या ३०० मीटर लांब रस्त्याची रुंदीकरण व काँक्रिटीकरण काम सुरू करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या या कामामुळे हा रस्ता लवकरच ५६ फूट रुंदीचा हमरस्ता होणार आहे. यामुळे परिसरातील नागरिक प्रवासी व वाहनधारकांमुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

        ६० वर्षांपूर्वी कोवाड नजीक ताम्रपर्णी नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला. यानंतर कोवाड ते बेळगाव जाण्यासाठी थांबणाऱ्या प्रवाशांसाठी ताम्रपर्णी नदीच्या पलीकडे एसटी महामंडळाने बांधलेल्या एका पिकप शेड शिवाय या परिसरात काहीही नव्हते. ही स्थिती १९८८ पर्यंत होती. त्यानंतर हळूहळू परिस्थिती बदलत गेली सद्यःस्थितीत येथे येथे अनेक इमारतींसह विविध व्यवसाय सुरू झाल्याने या परिसराला बाजारपेठेचे स्वरूप आले आहे. किणी, ता. चंदगड गावच्या हद्दीत येणारा हा परिसर सुरुवातीस अनेक सुविधांपासून वंचित होता.

        पावसाळ्यात वारंवार ताम्रपर्णी नदीला येणाऱ्या महापुरामुळे येथील रस्ता व परिसर पाण्याखाली जात असतो. अरुंद रस्त्यावर साठणारे पाणी व चिखलाचे साम्राज्य यामुळे येथील व्यावसायिक व नागरिक त्रस्त झाले होते. तथापि किणी ग्रामपंचायत या समस्या निराकरणासाठी नेहमी प्रयत्नशील असते त्यांच्या प्रयत्नातूनच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हा रस्ता तब्बल १७ मीटर रुंदीचा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान हा रस्ता करत असताना पुढे आलेली अनेक बांधकामे तोडल्यामुळे घर मालकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. 

          सध्या पाण्याचा निचरा होण्यासाठी दुतर्फा गटारी बांधणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची उंची वाढवण्याबरोबरच कॉंक्रिटीकरण काम सुरू होणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर स्टॅन्ड ते किणी फाट्यापर्यंत सुमारे ३०० मीटर लांबीचा हा 'हमरस्ता' होणार असल्याने पावसाळ्यात पूर व पूर ओसरल्यानंतर प्रवासी, वाहनधारक, दुकान मालक, ग्राहक व रहिवाशांना होणारा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे. तथापि पावसाळा सुरू झाल्यानंतर सुरू झालेले रुंदीकरण, गटारी बांधणी व रस्ता कामामुळे परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे येथील व्यापारी. दुकानदार, नागरिक वाहनधारकही त्रस्त झाले आहेत. रस्त्यात झालेल्या चिखलामुळे येथील दुकाने ग्राहकांविना ओस पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे संबंधितांनी हे काम युद्ध पातळीवर सुरू ठेवून लवकर पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment