मुकबधिर दांपत्याच्या मुलीने दहावी परीक्षेत ९० टक्के गुण घेत घडवला इतिहास - चंदगड लाईव्ह न्युज

21 June 2024

मुकबधिर दांपत्याच्या मुलीने दहावी परीक्षेत ९० टक्के गुण घेत घडवला इतिहास

 

कोल्हापूर येथे दादू मामा ट्रस्ट च्या वतीने स्वरांजली यमगेकर व तिच्या मूकबधिर आई-वडीलांचा सत्कार करताना ट्रस्टचे पदाधिकारी व जॉर्ज क्रूज

संपत पाटील / चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       आई व वडील दोघेही मूकबधिर, भूमिहीन कुटुंबाचा टेलर काम करून कुटुंबाचा चरितार्थ चालवणारे वडील, तरीही  मुलगीने नुकत्याच झालेल्या दहावी परीक्षेत ९० टक्के गुण घेत इतिहास घडवला. यामुळे मूकबधिर आई वडिलांची मान अभिमानाने उंचावली. ही कौतुकास्पद कामगिरी करणारी मुलगी आहे खानापूर (ता. भुदरगड) येथील स्वरांजली महेश यमगेकर.

मूकबधिर दांपत्याच्या मुलीने दहावी परीक्षेत ९० टक्के गुण घेत घडवला इतिहास

     सद्यःस्थितीत हायस्कूल मधील विद्यार्थीदशेतच चंगळवादी जीवनशैलीला चटवलेल्या काळात मुलांचे अभ्यासाकडे पुरते दुर्लक्ष होत आहे. यात बऱ्याच अंशी आपल्या मुलांवर सुसंस्कार घडविण्यात आई वडील कमी पडत असल्याचे चित्र असताना आई व वडील दोघेही मूकबधिर, शिवारात एक गुंठा ही जमीन नाही, कुटुंबाचा गाडा मुकबधीर असलेले वडील टेलर काम करून चालवत असताना मुलगीने मिळवलेले उत्तुंग यश लक्षवेधी ठरले आहे.

    खानापूर येथे मुकबधीर आई- वडील, आजी व लहान बहिणी सोबत राहणाऱ्या स्वरांजलीचे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत तर आठवी ते दहावीपर्यंत गावातील राजमाता हायस्कूल येथे झाले. हायस्कूलमध्ये तिला वर्गशिक्षक युवराज नाईक, मुख्याध्यापिका आर्या पाटील व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. खडतर परिश्रम, जिद्द चिकाटी व प्रयत्नवादी वृत्ती यामुळे दहावी परीक्षेत गरुड भरारी घेणाऱ्या स्वरांजलीने अनेक स्वयंसेवी संस्था व व्यक्तींचे लक्ष वेधून घेतले. 

      तिच्या कौतुकास्पद यशाची बातमी समजताच अशा वेगळ्या विद्यार्थ्यांच्या शोधात असणाऱ्या कोल्हापूर येथील दादू मामा ट्रस्ट च्या वतीने अध्यक्ष मुरलीधर दादोजीराव देसाई यांनी ट्रस्टच्या वतीने विजयश्री अकॅडमी सम्राट नगर कोल्हापूर येथे आयोजित कर्तृत्ववान गुणवंतांच्या सत्कार समारंभात तिचा विशेष सन्मान करत रोख आर्थिक मदत केली .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. जॉर्ज क्रूज होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले शिवराज महाविद्यालय व शिक्षण संस्था गडहिंग्लज चे माजी प्राचार्य किसनराव कुराडे यांनी स्वरांजली यमगेकर हिच्या अकरावी पासून पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतली.  या पुढे ती कोणत्याही क्षेत्रात शिक्षण घेऊ दे तिच्या शिक्षण व राहण्या जेवणाचा खर्च आपण करत असल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेने स्वरांजलीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. यावेळी त्यांनी दादू मामा ट्रस्टच्या उपक्रमाचेही कौतुक करत त्यांच्यामुळेच आपल्याला असे विद्यार्थी भेटले असे गौरवोद्गार काढले. 

      स्वरांजलीच्या यशामुळे भारावून जात तिचे मामा सुभेदार मेजर रवींद्र गोविंदराव चव्हाण व सुभेदार मेजर गजानन गोविंदराव चव्हाण (निपाणी) यांनी चव्हाण कुटुंबीयांमार्फत तिचा यथोचित सन्मान करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. स्वरांजलीचे दहावी परीक्षेतील हे कष्टसाध्य यश निश्चितच कौतुकास्पद व इतर विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रेरणादायी असेच आहे.

No comments:

Post a Comment