बेळगाव येथील माईंड पॉवर सेमिनारला मराठा विद्यार्थी, पालकांचा प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

09 July 2024

बेळगाव येथील माईंड पॉवर सेमिनारला मराठा विद्यार्थी, पालकांचा प्रतिसाद

 


बेळगाव : सी. एल. वृत्तसेवा 
     बेळगाव जिल्हा मराठा सेवा संघ आयोजित माईंड पॉवर सेमिनारला बेळगाव व परिसरातील विद्यार्थी व पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला. अशी माहिती मराठा सेवा संघ बेळगाव जिल्हा अध्यक्ष किरण धामणेकर यांनी दिली.
      कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध माईंड ट्रेनर आणि मोटिवेशन स्पीकर विनोद कुराडे यांचे मार्गदर्शन मराठा सेवा संघ बेळगाव जिल्हा यांच्यावतीने जून २०२४ मध्ये आयोजित केले होते. त्याला उदंड प्रतिसाद लाभल्यानंतर बेळगाव शहर व परिसरातील पालकांनी असे मार्गदर्शन पुन्हा झाले पाहिजे यासाठी आग्रह धरला होता. त्यावरून रविवार दि. ०७/०७/२०२४ रोजी मराठा सभागृह, गणेश कॉलनी, संभाजी नगर, वडगांव बेळगांव येथे हा कार्यक्रम पार पडला.
    राजमाता जिजाऊ, शिवप्रतिमेचे पूजन व जिजाऊ वंदना गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आर.के पाटील (चंदगड), कमलेश मौर्य (वाराणसी), नारायण सांगावकर (मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष), मनोहर घाडी (सचिव ) यांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले. 
      मराठा सेवा संघाचे अध्यक्ष किरण धामणेकर यांनी प्रास्ताविकात मराठा सेवा संघाच्या कार्याची माहिती दिली. ते म्हणाले मराठा समाजाचे बरेच युवक राजकीय पक्ष आणि राजकीय संघटनांमध्ये अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक उन्नती  कुंठली आहे. त्यासाठी मराठा समाजातील युवकांनी राजकीय पक्ष, राजकीय संघटनांतून  बाहेर पडावे. व्यसनाधीनतेपासून दूर राहून आपली आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक उन्नती केली पाहिजेत. त्यांनी बेळगाव येथे इयत्ता 5 वी ते 9 वी वयोगटातील मुलांना मोफत प्रशिक्षण वर्ग सुरु करणार असून या  प्रशिक्षण वर्गात काय काय शिकवले जाईल याची माहिती दिली.
      पाहुण्यांचे स्वागत शिवश्री शिवाजी जाधव (ASI) यांनी केले. त्यांनी मराठा समाजाबद्दल आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले यत्रा, जत्रा मध्ये होणारा खर्च कमी केला पाहिजेत. विद्यार्थांना मार्गदर्शन करताना आपली कर्तव्य काय आहेत? आपण काय केले पाहिजेत हे सांगितले. पालकांना ते म्हणाले आईच्या पोटात जेव्हा बाळ असते तेव्हापासूनच मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजेत. मनातून सगळे वाईट विचार काढून दिले पाहिजेत, तरच मुले प्रगती करतील असे ते म्हणाले. 
      मुख्य मार्गदर्शक विनोद कुराडे यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, एकाग्रता व स्मरणशक्ती कशी वाढवावी याबाबत मार्गदर्शन केले. आभ्यासाची भिती दूर करा, यश निश्चित तुमच्या हातात आहे, आपल्या आवडीच्या क्षेत्रातच करिअर करा. असे अवाहन केले. माईंड पॉवर चा उपयोग करुन परिक्षेमध्ये यश मिळविण्यासाठी ध्येयनिश्चिती कशी करावी, बहिर्मन, अंतर्मन व विश्व मनाचे आपल्या जीवनातील महत्व, क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशनव्दारे हवे ते यश मिळण्याचे रहस्य याबद्दल त्यांनी सांगितले.
        यावेळी शिवश्री नागेश कालींग (बेळगांव लाईव्ह), शिवश्री श्रेयश रमेश पाटील, शिवश्री रमेश धामणेकर (बिल्डिंग कॉंन्ट्रॅक्टर) यांचा ग्रंथ आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मराठा सेवा संघाचे सभासद आनंद काटकर, पंकज सातवणेकर, भरतेश पाटील, भारत काकडे, संदिप घाडी, जगदिश शट्टीबाचे, विशाल मुतकेकर आदी सदस्य उपस्थित होते. मराठा सेवा संघाचे सचिव शिवश्री मनोहर घाडी यांनी सुत्रसंचालन केले. मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष नारायण सांगावकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment