कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
आदिलशाही सरदार सिद्धी जौहर याने पन्हाळगडाला टाकलेल्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना सहीसलामत सोडवण्यासाठी महाराजांच्या वेशात जौहरच्या भेटीला जाऊन आत्मबलिदान केलेले नरवीर शिवा काशीद, त्यांच्या ३६४ व्या पुण्यतिथी निमित्त पन्हाळगड व नेबापूर परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
"लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे." असे म्हणत १२ जुलै १६६० च्या रात्री मुसळधार पावसात हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसणारे स्वामीनिष्ठ शिवा काशीद नकली महाराज बनून जौहरच्या भेटीला गेले. परिणामी किल्ल्याभोवती शत्रूंनी आवळलेला वेढा शिथील झाला. याचा फायदा उठवत स्वामीनिष्ठ बाजीप्रभू देशपांडे व पाचशे मावळ्यांसह शिवरायांनी विशाळगडाकडे कूच केली. पण शिवा काशीद यांची तोतियेगिरी उघडकीस येताच चवताळलेल्या सिद्धी जोहरने त्यांची जागेवरच खांडोळी केली. या घटनेने स्वराज्यासाठी आत्मबलिदान करणारे शहीद नरवीर शिवा काशीद हे इतिहासात अमर झाले.
दुसरीकडे वेढ्यातून निसटलेल्या शिवराय व मावळ्यांना गाठण्यासाठी सिद्धी मसउदने दहा हजार सैन्यानिशी अंधाऱ्या रात्री मुसळधार पावसात पाठलाग करत गजापूरच्या (ता. शाहूवाडी) घोडखिंडी नजीक गाठले. यावेळी बाजीप्रभू देशपांडे यांनी निम्मे मावळे शिवरायांसोबत देऊन त्यांना विशाळगडाकडे पाठवले व उर्वरित मावळ्यांसह शत्रूला घोडखिंडीत रोखून धरले. १३ जुलै १६६० रोजी झालेल्या घोडखिंडीतील घनघोर लढाईत बाजीप्रभूंसह अनेक मावळे शत्रूशी लढता लढता धारातीर्थी पडले. म्हणूनच छत्रपती शिवराय सुखरूप विशाळगडावर पोहोचले. स्वामीनिष्ठेचे असे जाज्वल्य उदाहरण जगाच्या इतिहासात कुठेही सापडणार नाही. त्यामुळेच शेकडो वर्षानंतरही हजारो शिवप्रेमी या दिवशी वीर शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे व मावळ्यांच्या स्मृतीला नतमस्तक होण्यासाठी येथे उपस्थित असतात.
सालाबाद प्रमाणे यंदाही महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा कोल्हापूर, कोल्हापूर जिल्हा नरवीर शिवा काशीद समाधी संवर्धन समिती व जिल्हा महिला आघाडी यांच्या वतीने स्वराज्य स्वामीनिष्ठ नरवीर शिवा काशीद यांच्या ३६४ व्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्त शनिवार दि. १३ जुलै २०२४ रोजी विविध कार्यक्रमांच्या आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.०० वाजता पन्हाळगडाच्या पायथ्याशी नेबापूर येथील शिवा काशीद स्मृतिस्थळ पूजन, १०.३० वाजता पुतळ्यास अभिषेक, ११.०० वाजता बाजीप्रभू देशपांडे यांच्या पन्हाळगडावरील पुतळ्याचे पूजन, ११.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन. तर दुपारी १२.०० वाजता पन्हाळा नगरपरिषद हॉल एसटी स्टँड नजीक पन्हाळा येथे इतिहास अभ्यासक मधुकर पाटील यांचे 'छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत मावळे शिवा काशिद यांची निष्ठा व आजचा समाज' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज, खा. धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, जिप. माजी उपाध्यक्ष भारतआप्पा पाटील यांच्यासह पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे, मुख्याधिकारी चेतनकुमार माळी, सरपंच पुष्पा कदम, युवक संघटना अध्यक्ष मोहनराव चव्हाण आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी शिवप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नाभिक समाज संघटनेचे राज्य व जिल्हा पदाधिकारी एम आर टिपुगडे आण्णा, सयाजी झुंजार, मारुती टिपूगडे, बाबासाहेब काशीद, मेघाराणी जाधव आदींनी संघटनेच्या वतीने केले आहे.
No comments:
Post a Comment