चंदगड तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, माणगाव बंधाराही पाण्याखाली...! - चंदगड लाईव्ह न्युज

08 July 2024

चंदगड तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, माणगाव बंधाराही पाण्याखाली...!चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

  चंदगड तालुक्यातून जाणाऱ्या बेळगाव - वेंगुर्ले राज्य मार्गावर सकाळी दाटे (ता. चंदगड) गावानजीक ताम्रपर्णीच्या पुराचे पाणी आले होते. परिणामी बेळगाव ते चंदगड, आंबोली, सावंतवाडी, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग सह गोव्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. मात्र सायंकाळी ६ वाजल्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणी उतरले. त्यामुळे दाटे गावानजीकच्या बेळगाव - वेंगुर्ले राज्य मार्गावर पाणी कमी झाले होते. त्यामुळे सकाळपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

   काल रात्री पासून ताम्रपर्णी नदीवरील माणगाव नजीकच्या बंधाऱ्यावर पाणी आल्यामुळे चंदगड, पाटणे फाटा ते कोवाड, कालकुंद्री राजगोळी परिसरात जाणाऱ्या वाहतुकीलाही ब्रेक बसला आहे. वरील मार्गावरील वाहतूक वाढत्या पाण्यामुळे ठप्प होण्याची शक्यता असल्याचे वृत्त चंदगड तालुक्याचे मुखपत्र 'सी एल न्यूज' ने कालच व्हिडिओसह प्रसिद्ध केले होते ते खरे ठरले.

  याशिवाय घटप्रभा नदीवरील गवसे- इब्राहिमपूर व ताम्रपर्णी नदीवरील चंदगड- हेरे मार्गावरील बंधारे याआधीच पाण्याखाली गेल्यामुळे अनुक्रमे चंदगड- इब्राहिमपूर मार्गे आजरा व चंदगड- हेरे, तिलारीनगर मार्गावरील वाहतूक तीन दिवसांपासून ठप्प आहे. यामुळे इकडील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. दरम्यान आज सोमवार दि. ८/७/२०२४ रोजी चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडील भागात पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे महापुराचे संकट काहीसे कमी झाले आहे. 

  तालुक्यात सर्वत्र भात रोप लावणी तसेच नाचणी लागवड जोरात सुरू असल्यामुळे अधूनमधून पाऊस गरजेचा असल्याचे मत शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. दुसरीकडे कृष्णा खोरे योजनेतील लघु पाटबंधारे प्रकल्प अद्याप भरलेले नाहीत. हे प्रकल्प भरण्याचीही प्रतीक्षा आहे.

No comments:

Post a Comment