कष्टकरी शेतकऱ्यांच्या पिकांना विम्याचे संरक्षण. कालकुंद्री परिसरातील आपल्या बैलजोडी औतासह शेतात कष्ट करणारा शेतकरी.
तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा
सन २०२३-२४ च्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये सलग दुसऱ्या वर्षी चंदगड तालूक्याने कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अशी माहिती चंदगड तालुका कृषि विभागामार्फत देण्यात आली.
या योजनेत चंदगड तालूक्यातील २७९६ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. कृषी विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने तालुक्यातील शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा लाभ मिळाला आहे. मागील वर्षी या योजनेतील एकूण २६१८ हेक्टर क्षेत्रातील सुमारे २५० ते ३०० शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान झाल्याने विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकाला कळवून आपल्या पिकांच्या नुकसानीची नोंद कळवली. त्यामध्ये नाचणी, भूईमूग, सोयाबीन व भात काढणी पश्चात नुकसान धरून तालुक्यातील २१० शेतकऱ्यांना एकूण रूपये १,२८,०६१०/- इतका लाभ देण्यात आला.
तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजना सन २०२४-२०२५ या चालू खरीप हंगामातही चंदगड तालूक्याचा प्रथम क्रमांक आला असून दिनांक १५ जून २०२४ ते १ ऑगष्ट २०२४ या कालावधीमध्ये भात, भुईमूग, नाचणी व सोयाबीन या पिकांचा ५१०८ शेतकऱ्यांनी ४४४५.७१ इतक्या हेक्टरवरचा विमा काढला आहे. चंदगड कृषी विभागामार्फत तालुका कृषी अधिकारी विजयकुमार ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड तालुका समन्वयक सागर पुंडलिक सुतार व सर्व ता कृषी सहाय्यक यानी प्रभावीपणे या योजनेचा प्रचार व प्रसार तसेच फॉर्म भरून सहभाग घेतल्याने जिल्हयात प्रथम क्रमांक आला. या योजनेमध्ये, कडलगे बुद्रक, कुदनूर, कालकुंद्री, बागीलगे, आमरोळी, दाटे, डूक्करवाडी, कोरज, हल्लारवाडी, जंगमहटट्टी, करंजगाव, नांदवडे, शिरगांव, होसूर, किटवाड, तेऊरवाडी, बसर्गे, बुक्कीहाळ, करेकुंडी या गावातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक विमा उतरवला आहे.
भाऊसाहेब फुंडकर काजू फळबाग लागवड योजनेत जिल्हयात पहिल्या टप्यात ६० शेतकऱ्यांची निवड करून प्रथम क्रमांक मिळवला आहे . कृषी विभागाच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment