बांधकाम कामगारांची लूट प्रश्नी पाटणे फाटा येथील आमरण उपोषण लेखी पत्रानंतर सहाव्या दिवशी मागे - चंदगड लाईव्ह न्युज

14 August 2024

बांधकाम कामगारांची लूट प्रश्नी पाटणे फाटा येथील आमरण उपोषण लेखी पत्रानंतर सहाव्या दिवशी मागे

पाटणे फाटा येथे उपोषणकर्ते नारायण वाईंगडे यांनी अधिकारी व कामगारांच्या उपस्थितीत सरबत पिऊन उपोषण सोडले.
चंदगड : सी एल वृत्तसेवा
    बांधकाम क्षेत्रातील कामगारांना शासन स्तरावरून विविध योजनांचे लाभ मिळत असतात. तथापि चंदगड तालुक्यातील कामगारांच्या या योजना परस्पर लाटल्या जातात. याला राजकीय नेते व संबंधित अधिकारी यांच्याकडून खतपाणी मिळते किंबहुना राजकीय नेतेच या योजना पळवत असल्याचा आरोप करत. योजना चोरांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे विधानसभा मतदारसंघ प्रमुख भाई नारायण रामू वाईंगडे (कुमरी) यांनी पाटणे फाटा, ता. चंदगड येथे सुरू केलेले उपोषण आज सहाव्या दिवशी मागे घेतले. 
   सहाय्यक कामगार आयुक्त कोल्हापूर तथा जिल्हा कार्यकारी अधिकारी इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सहाय्यक कामगार आयुक्त यांनी लेखी आश्वासन दिले. यावेळी विजयकुमार पाटील, प्रा नागेंद्र जाधव, शामराव मुरकुटे, रवी पाटील, अश्विन पाटील यांच्यासह शेकापच्या अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सरबत घेऊन उपोषण मागे घेतले.
  राजकीय नेते खऱ्या कामगारांच्या तोंडातील घास काढून घेऊन तो आपल्या मर्जीतील बोगस कामगारांना देतात. यामुळे खरे लाभार्थी वंचित राहतात. असा आरोप करून ज्या अधिकाऱ्यांच्या सहीने असे लाभ मंजूर झाले आहेत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे निवेदन वाईंगडे यांनी तहसीलदार यांना देऊन उपोषण सुरू केले होते.  या योजनांचा वापर काही राजकारणी एजंटांमार्फत स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी करून कामगारांना लुटत आहेत. तर कामगार नोंदणी, पेटी बॉक्स, भांडी सेट बॉक्स , कामगार नूतनीकरण, कामगारांच्या मुलांसाठी शिक्षण स्कॉलरशिप आदी योजना कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन राजकीय वरदहस्ता खाली पोसलेले दलाल योजना मंजूर करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैसा उकळून त्यांचे आर्थिक शोषण करतात. वास्तविक या सर्व मोफत योजना व लाभ  सर्वांपर्यंत पोहोचविणे हे शासनाचे धोरण आहे. मात्र त्याला हरताळ फासून काही राजकारणी व दलालांनी वारेमाप पैसा मिळवला आहे. त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. सहा दिवस आंदोलनाला बांधकाम सह  विविध क्षेत्रातील लोकांनी पाठिंबा दर्शवला होता. 
   दरम्यान पाचव्या दिवशी सकाळपासून उपोषण कर्ते नारायण वाईंगडे यांची तब्येत मोठ्या प्रमाणात खालावल्यामुळे मोठ्या संख्येने कामगार पाटणे फाटा परिसरात जमू लागले होते. त्यामुळे वातावरण हळूहळू प्रक्षोभक बनत चालले होते. तथापि वेळीच येऊन कामगार आयुक्त व त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिल्याने उपोषण थांबले असले तरी पत्राची अंमलबजावणी तात्काळ न झाल्यास हा विषय यापुढेही संघटना गांभीर्याने घेणार असून यातील चोरांची नावे सार्वजनिक रित्या उघड करण्याचा इशारा यावेळी वाईंगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे. 

No comments:

Post a Comment