कुदनूर येथील के डी सी सी बँक व कामधेनू दूध संस्थेवर दरोड्याचा प्रयत्न |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कुदनूर (ता. चंदगड) येथील गावच्या मध्यवस्तीत व मुख्य मार्गावर असलेल्या कामधेनु दूध संस्था व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेत अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. याबाबतची फिर्याद बँकेचे कॅशियर शिवकुमार गंगाधर जंगम यांनी पोलिसात दिली.
याबाबत घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, दरोडाच्या प्रयत्नाची ही घटना शुक्रवार दि. १६ ऑगस्ट रात्री ९ ते १७ ऑगस्ट २०२४ च्या पहाटे सहा वाजण्याच्या दरम्यान घडली. कुदनूर येथील कागणी- राजगोळी मुख्य रस्त्यावर कामधेनू सहकारी दूध संस्थेच्या इमारतीत खालच्या मजल्यावर दूध संस्था तर वरच्या पहिल्या मजल्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. वरील वेळी अज्ञात चोरट्यांनी संस्थेचे बंद स्थितीत असलेले कुलूप तोडून शटर उचकटून दूध संस्था व बँकेत प्रवेश केला. शासनाच्या लाडकी बहीण योजनेतील महिलांना वाटण्यासाठी आणलेली मोठी रक्कम बँकेच्या तिजोरीत होती असे समजते. तथापि तिजोरी तोडण्याचा प्रयत्न यशस्वी ठरल्याने मोठा अनर्थ टळला. १७ तारखेला सकाळी दूध संस्था उघडताना हा प्रकार निदर्शनास आला. याबाबत बँकेचे शाखा व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना माहिती दिल्यानंतर कॅशियर यांनी कोवाड पोलिसात प्रथम फिर्याद नोंद केली. यानंतर पोलिस खात्याकडून तात्काळ हालचाली सुरू करण्यात आल्या. श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. सर्व प्रकारची यंत्रणा राबवण्यात आली. यात बँकेतील रक्कमेवर डल्ला मारण्यात चोर अयशस्वी ठरले असले तरी दूध संस्थेतील किरकोळ रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची चर्चा सुरू होती. तथापि याला पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
गेल्या पंधरा वर्षांत दोन वेळा दूध संस्था व बँकेत डाका घालण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. अशा प्रकारच्या वाढत्या घटना लक्षात घेता कुदनूर ग्रामपंचायत मार्फत उपाययोजना करावी तसेच बँक प्रशासन, गावातील विविध दूध संस्था व ग्रामपंचायत यांच्यामार्फत मुख्य मार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत या कमी चंदगड व कोवाड पोलिसांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी होती. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नाईक हे करत आहेत.
1 comment:
प्रयत्न यशस्वी ठरला तर अनर्थ कसा टळला..? काय बातम्या देता राव जरा एकदा चेक तरी करत रहा
Post a Comment