अहो आश्चर्यम....! गाभण न जाताच वासरू देऊ लागले रोज दूध! कुठे घडला प्रकार? - चंदगड लाईव्ह न्युज

07 August 2024

अहो आश्चर्यम....! गाभण न जाताच वासरू देऊ लागले रोज दूध! कुठे घडला प्रकार?

 

बिजगर्णी येथील बहुचर्चित अकाली दूध देणाऱ्या पाडीचे दूध काढताना शेतकरी सदानंद मोरे

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

      गाभण न जाताच २८ महिन्यांचे वासरु (पाडी) रोज दोन लिटर दूध देत आहे. हा आश्चर्यजनक प्रकार बेळगाव सीमा भागासह चंदगड तालुक्यात कुतूहल व चर्चेचा विषय ठरला आहे. 

      बिजगर्णी (ता. जि. बेळगाव) येथील  सदानंद मोरे यांच्या गाईची ही पाडी २८ महिन्यांची असून ती अद्याप एकदाही गाभण गेलेली नाही किंवा व्यालेली नाही. मोरे यांच्या गोठ्यातील नऊ जनावरांपैकी एक असलेल्या पाडीच्या कासेचा आकार वाढल्याचे निदर्शनास आल्याने मोरे यांनी काही दिवसांपूर्वी पाडीची कास व स्तन दाबून दूध येते का पाहिले असता त्यातून दूध येत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर कुटुंबीयांनी दूध काढण्यास सुरुवात केली. सध्या हे रोजचे काढलेले दोन लिटर दूध डेअरीला घातले जात आहे. या दुर्मिळ घटनेची परिसरात आश्चर्य मिश्रित चर्चा होत असून शेतकरी व दूध उत्पादक वर्गात हा कुतूहलाचा विषय बनला आहे. दूध देणारी ही पाडी पाहण्यासाठी मोरे यांच्या बिजगर्णी येथील घरी  पंचक्रोशीतील लोकांची गर्दी होताना दिसत आहेत.

हार्मोन्सचे असंतुलन कारणीभूत...! - पशुधन विकास अधिकारी डॉ. परीट

    या अपवादात्मक प्रकाराबद्दल निवृत्त पशुधन विकास अधिकारी डॉ. व्ही के परीट-यादव (कालकुंद्री, ता. चंदगड) यांच्याशी चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी संपर्क साधला असता त्यांनी "जनावरांच्या शरीरामध्ये pituitary (पिट्युटरी) ग्रंथी मार्फत सर्व संप्रेरके (हार्मोन्स)तयार करून वितरीत केले जाते. दुध उत्पादन हे प्रोलॅक्टीन संप्रेरक मुळे होते. योग्यवेळी सर्व हार्मोन्स तयार होण्याची प्रक्रिया ही normal असते. अवेळी अथवा लहान वयात दुध देणे ही अनैसर्गिक बाब आहे. याचे कारण म्हणजे हार्मोन्सचे असंतुलन (harmons imbalance)  हे आहे. तथापि अशी जनावरे गाभण न जाता शेवटी वाया जाण्याची शक्यता जवळपास ९९ टक्के असते." असे डॉ व्ही के परीट यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment