नुकसानग्रस्त शेती व घरांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या...! मनसे सह माजी मंत्री भरमूआण्णा यांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

05 August 2024

नुकसानग्रस्त शेती व घरांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या...! मनसे सह माजी मंत्री भरमूआण्णा यांची मागणी

 

कोवाड परिसरात नदीच्या पुरात सापडलेल्या पिकांची अशी अवस्था झाली आहे.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

         चंदगड तालुक्यात अतिवृष्टी व महापुरामुळे नदीकाठच्या शेतातील पिके तसेच घरांचे मोठे नुकसान झाले आहे. बाधित पिके व घरांचे महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी मंत्री भरमूआण्णा पाटील यांनी केली असून हीच मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाटील व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

      गेल्या १५-२० दिवसात चंदगड तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टीमुळे ताम्रपर्णी व घटप्रभा नद्यांनी अक्राळ विक्राळ रूप धारण केले. कृषी विभागाच्या अंदाजानुसार नद्या व ओढ्यांच्या काठावरील सुमारे २३९३ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. यात शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार आहे. शेतीबरोबरच राहती घरे कोसळूनही अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत.

      चंदगड तालुक्यात खरिपाच्या पेरण्या झालेल्या २१००० हेक्टर क्षेत्रापैकी अतिवृष्टीने २३९३ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. १३,७०० पैकी  ८०० हेक्टर भात पिक पुरामुळे बाधित झाले आहे. नाचणी ६३८० हेक्टर पैकी १९४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. भुईमूग १३६६ हे. पैकी २७३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. १८५०० हेक्टर क्षेत्रापैकी १११४ हेक्टर ऊसाचे नुकसान झाले आहे. तर सोयाबीनचे ४० पैकी १२ हेक्टर वरील नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या किंवा पुरात बुडून कुजलेल्या पिकांच्या ठिकाणी आत्ता कोणते पिक लावावे हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

      चंदगड तालुक्यातील बागीलगे, कुदनूर, राजगोळी बुद्रुक, दुंडगे, कोवाड, किणी, कालकुंद्री, म्हाळेवाडी, शिवणगे, माणगाव, रामपूर, तांबुळवाडी, बसर्गे, ढोलगरवाडी तावरेवाडी, शेवाळे, निट्टूर, घुल्लेवाडी, तेऊरवाडी, नागरदळे, कडलगे बुद्रुक, दाटे ,चंदगड, करंजगाव, नरेवाडी, गुडेवाडी, हलकर्णी, कानूर बुद्रुक, अडकूर, आमरोळी, गवसे, कानडी, कुरणी, हाजगोळी, ढेकोळी, जंगममट्टी, केचेवाडी, गणूचीवाडी, जोगेवाडी, उसाळी, पोवाचीवाडी, नांदवडे, खालसा कोळींद्रे, हिंडगाव, कुर्तनवाडी, कोरज, पाटणे या गावांचा समावेश आहे. 

       सध्या पूर ओसरु लागल्याने पिके कुजलेली पिके बाहेर दिसू लागली आहेत. दरम्यान सध्या नुकसान झालेली घरे व पिकांचे पंचनामे शासकीय यंत्रणेमार्फत सुरू आहेत. गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून हे कर्मचारी संकटग्रस्त शेतकऱ्यांची आणखी अडवणूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. तथापि त्यांना कोणताही त्रास न देता पंचनामे व नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील रहावे अशी मागणी भरमूआण्णा पाटील व महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंदगड तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे. पंचनामे वेळेत व आढेवेढे न घेता करावेत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पूर्वीच्या सवयीनुसार शेतकऱ्यांना त्रास दिल्याचे निदर्शनास आल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाटील, तालुकाध्यक्ष राज सुभेदार, सरचिटणीस तुकाराम पाटील, संभाजी मनवाडकर, सुनील तलवार, जोतिबा भोगण, अरुण कित्तुरकर, अमर प्रधान, भावकू नाईक, रमेश पाटील, शुभम पाटील आदींनी दिला आहे.

No comments:

Post a Comment