ढोलगरवाडीत नागपंचमी निमित्त मिळणार चित्राद्वारे सापांची माहिती, शासकीय उदासीनतेमुळे सर्प प्रबोधन केंद्राला घरघर...! - चंदगड लाईव्ह न्युज

08 August 2024

ढोलगरवाडीत नागपंचमी निमित्त मिळणार चित्राद्वारे सापांची माहिती, शासकीय उदासीनतेमुळे सर्प प्रबोधन केंद्राला घरघर...!

 


कालकुंद्री : श्रीकांत पाटील सी/ एल वृत्तसेवा

      हजारो सर्पप्रेमी व भाविकांच्या उपस्थितीत दरवर्षी ढोलगरवाडी तालुका चंदगड येथील सर्प शाळेच्या वतीने नागपंचमी साजरी केली जात होती. गेल्या दोन-चार वर्षात येथे जीवंत सापांच्या साह्याने माहिती देण्यावर झू अथॉरिटी ऑफ इंडिया नवी दिल्ली व केंद्रीय वन्य प्राणी संग्रहालय मंत्रालयाच्या वतीने मनाई केली आहे. खरे पाहायला गेले तर पर्यावरण साखळीतील सर्वोच्च स्थानी असलेल्या सापांबद्दल चे प्रबोधन जे शासकीय स्तरावरून होणे गरजेचे आहे. ते ढोलगरवाडी येथे शाळेमार्फत पदरमोड करून केले जाते. आद्य सर्पमित्र कै बाबुराव टक्केकर यांनी सन १९६६ पासून सुरू केलेले हे कार्य गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी पर्यंत अखंडित सुरू होते. नागपंचमी उत्सवामुळे ढोलगरवाडी गावाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचले आहे. ते वैभवशाली दिवस व सर्पोद्यान शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. नव्या जाचक नियमावली मुळे यंदा शुक्रवार दि. ९ ऑगस्ट २०२४ रोजी होणारी नागपंचमी केवळ चित्रफित व छायाचित्रांच्या आधारे शास्त्रीय माहिती देऊन साधेपणाने साजरी केली जाणार आहे. किंबहुना नागपंचमी निमित्त कोणताही कार्यक्रम करू नका असेच आदेश आहेत. सर्प प्रेमी व भाविकांतून नव्या जाचक नियमावली बद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत असून ढोलगरवाडी साठी खास बाब म्हणून ही नियमावली शिथिल करावी. तसेच सुसज्ज सर्पोद्यानसाठी शासकीय स्तरावरून भरीव अनुदान मिळावे अशी मागणी होत आहे.

आद्य सर्पमित्र कै बाबूराव टक्केकर

  ढोलगरवाडी सर्प शाळेमार्फत गेली ५८ वर्षे पर्यावरण संवर्धन व लोक जागृतीसाठी सापांची शास्त्रीय माहिती दिली जाते. यामध्ये विषारी, बिनविषारी साप, सर्पदंश, प्रथमोपचार, सापांबद्दल असलेली अंधश्रद्धा, गैरसमज दूर व्हावी यासाठी शास्त्रीय माहिती दिली जाते. आद्य सर्पमित्र कै बाबूराव टक्केकर यांनी सुरू केलेली ही परंपरा आजतागायत अखंडितपणे सुरू आहे. सर्प शाळेतून हजारो सर्पमित्र तयार झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने येथून आर्मी, फायर ब्रिगेड, पोलीस, वन खाते यामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्प हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाते. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, डॉक्टर यांच्यासाठीही हे माहिती केंद्र बनले आहे. तथापि यंदाही केंद्रीय प्राणी संग्रहालय मंत्रालयाच्या निकषातील अटींची पूर्तता होईपर्यंत नागपंचमी कार्यक्रम करू नयेत असे आदेश आहेत. तथापि वनविभाग कोल्हापूर यांच्या मेहरबानीने वन परिक्षेत्र पाटणे यांच्या देखरेखी खाली केवळ पोस्टर, चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून येथील शेतकरी शिक्षण मंडळ संचलित मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे सटूप्पा टक्केकर उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित नागरिक व भाविकांना माहिती देणार आहेत.

   नागपंचमी निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजनासाठी झालेल्या बैठकीवेळी पाटणे वनविभागाचे रेंजर प्रशांत आवळे, वनपाल जी आर डिसोजा, संस्थेचे अध्यक्ष डॉ नितीन चौगुले, उपाध्यक्ष तानाजी वाघमारे, मुख्याध्यापक एन जी येळ्ळूरकर, सर्पोद्यान विभाग प्रमुख प्रा सदाशिव पाटील, प्रकाश टक्केकर, व्ही आर पाटील, प्रा एन आर पाटील, मधुकर बोकडे, संदीप टक्केकर आदी उपस्थित होते.

   सर्पोद्यान साठी विस्तीर्ण जागेसाठी संस्था व वनखात्याच्या वतीने तिलारी परिसरात  विस्तीर्ण जागतिक दर्जाचे अद्यावत असे सर्पोद्यान उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सर्व क्षेत्रातील दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी वाघमारे- टक्केकर यांनी यावेळी केले. 

No comments:

Post a Comment