चंदगड / सी एल वृतसेवा
यावर्षी झालेल्या पावसामुळे चंदगड तालुक्यातील हजारो एकर शेती या पुरामुळे बाधित झाली आहे. केवळ ताम्रपर्णी व घटप्रभेचा काठच नव्हे तर तालुक्यातील अनेक लहान मोठ्या नदी काठच्या शेतीलाही या पुराचा मोठा फटका बसला आहे. सलग २१ दिवस पिके पाण्याखाली राहिल्याने पिके कुजून गेली आहेत.
पुराचा कोवाड फटका बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना देखील बसला आहे. ताम्रपर्णी बरोबरच इतर नदी व ओढ्याकाठची शेती संपुष्टात आली आहे. काही शिवारात पाऊस गेल्यानंतर अजूनही पाणी आहे.कुजलेल्या पिकांची चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनाक १२ ऑगस्ट रोजी सकाळी १०वाजता शेतकर्यांचा कोवाड ते चंदगड पायी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.यावेळी नुकसानीबाबतचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात येणार आहे.
चंदगड तालुक्यात झालेल्या प्रचंड पावसाने नदी काठी आलेल्या पुरामुळे भात शेती कुजून गेली आहे. वैरणीचीही तीच अवस्था आहे. पुरामुळे शिवारात दुर्गंधी पसरली आहे.त्याचबरोबर ऊस व इतर शेती पिकांना सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. सततच्या पाऊस ,पाण्यामुळे पिकांची वाढ खुंटलेली आहे. त्याचा उत्पादनावर परिणाम नक्कीच होणार आहे. पाणी साचल्याने नदीकाठचा सुपीक शेती असणारा भाग मोठ्या प्रमाणात बाधित झाला आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेली शेती कुजून जाताना पाहताना शेतकऱ्यांना वेदना होत आहेत.
हंगाम संपल्याने आता पुन्हा भात लावण्याची परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे शेतकर्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीकडे सरकारने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. पुराने बाधित झालेल्या सर्व क्षेत्रांचे पंचनामे झाले पाहिजे.शासनाची नुकसान भरपाई रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे. पंचनामा व नुकसान भरपाई देण्यातल्या जाचक अटी प्रशासनाने दूर केल्या पाहिजे. कारण या महागाईत अनेक औषधे, प्रयोग आणि कष्ट करून पिकवलेली शेती संपुष्टात आली आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास उद्भवलेल्या पुर परिस्थितीने दुरावला गेला आहे. पूर परिस्थितीला जबाबदार अतिक्रमण व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्हायासाठी पायी मोर्चा कोवाड, निट्टूर ,माणगाव रामपूर ,बागिलगे तांबुळवाडी फाटा या मार्गे चंदगडला जाणार आहे.तरी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी या आक्रोश मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन नितीन पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment