स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच एसटी आली गावात...! चंदगड तालुक्यातील कोणते आहे गाव...? - चंदगड लाईव्ह न्युज

12 August 2024

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच एसटी आली गावात...! चंदगड तालुक्यातील कोणते आहे गाव...?

 

नांदुरे येथे आलेल्या पहिल्या एसटीचे स्वागत प्रसंगी नगरसेवक हळदणकर, ग्रामस्थ, वाहक, चालक व एसटीचे अधिकारी.

चंदगड : सी एल वृत्तसेवा

      स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनंतरही राज्य परिवहन मंडळाची एसटी न पोहोचलेली अनेक गावे चंदगड तालुक्यात आजही आहेत. त्यापैकीच एका गावाचे भाग्य आज दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी उजळले आणि चंदगड आगाराची एसटी प्रथमच गावात दाखल झाली. गावात पहिल्यांदाच आलेल्या एसटी बसचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. ते गाव आहे चंदगड तालुक्याच्या पश्चिमेकडील दुर्गम व डोंगराळ भागात वसलेले 'नांदुरे'..!

    कानूर परिसरात असलेल्या नांदुरे या गावातील अनेक विद्यार्थी शाळा महाविद्यालयात शिकण्यासाठी चंदगड येथे येतात. बाजारहाट, बँक, शासकीय कामे, दवाखान्यासाठी ग्रामस्थांना चंदगड शिवाय पर्याय नाही. अशा अवस्थेतील नांदुरे वासियांची अनेक वर्षांपासून गावात महामंडळाची एसटी आणण्यासाठी धडपड सुरू होती.  त्यांच्या वेदना व समस्या सामाजिक कार्यकर्ते व चंदगड नगरपंचायतीचे नगरसेवक बाळासाहेब उर्फ आनंद हळदणकर यांच्या पर्यंत पोहोचल्या. त्यांनी लगेच गावचे सरपंच, उपसरपंच व काही मंडळींना हाताशी घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा व पत्रव्यवहार सुरू केले. याकामी त्यांचे सुमारे  एक वर्षापासून प्रयत्न सुरू होते. त्याला अखेर यश आले.

   नांदुरे पासून जवळच असलेल्या धामापूर येथे चंदगड आगाराची बस दिवसातून दोन वेळा येत होती. तीही गेले काही महिने बंद होती. परिणामी येथील विद्यार्थी, रुग्ण, ग्रामस्थांना वन्य प्राणी तसेच ऊन, वारा, पाऊस, थंडी, अंगावर झेलत जंगल भागातून वाट काढत एसटी साठी कानूर बुद्रुक पर्यंत पायपीट करावी लागत होती. मुलींचा प्रवास तरी अधिकच असुरक्षित होता. धामापूर पर्यंत जाणारी व बंद पडलेली हीच बस पुढे न्यायची यासाठी नगरसेवक हळदणकर व सर्वांचे प्रयत्न व चंदगड आगार प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्यातून ही बस १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनापूर्वी नांदुरे गावात दाखल झाली. गावात एसटी आल्याबरोबर  आबालवृद्धांनी आनंदोत्सव साजरा केला. जल्लोषात एसटीचे स्वागत केले. गावातील महिलांनी लाल परिसह वाहक, चालक, अधिकारी, नगरसेवक हळदणकर, सरपंच उपसरपंच यांची ओवाळणी केली.

  चंदगड पासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदुरे गावापर्यंत दिवसातून दोन वेळा लाल परी धावणार असल्याने नांदुरे सरळ मार्गावरील प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. पहिल्या लालपरी च्या स्वागत प्रसंगी चंदगडचे नगरसेवक बाळासाहेब हळदणकर, सरपंच संतोष मोरे, उपसरपंच एकनाथ खवणेवाडकर, सोमनाथ पवार, विलास चौकुळकर, गणपत गुरव, बाळू सुकये, दूध संस्था चेअरमन सदाशिव हंबेरकर, पांडुरंग सुकेये, आनंदा खवणेवाडकर, सावबा चौकुळकर, गणपत गुरव, सिताराम नाईक,  नागेश प्रधान,पांडुरंग खामकर, यशवंत पडकीलकर, लक्ष्मण चौकूळकर, निवृत्ती खामकर, प्रवीण जाधव, विद्यार्थी व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment