चंदगड येथील ग्रामीण रुग्णालय नजीक एसटी थांब्याचे उद्घाटन करताना नगरसेवक हळदणकर, वैद्यकीय अधिकारी व ग्रामस्थ |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड येथील सामाजिक कार्यकर्ते व चंदगड नगरपंचायतचे नगरसेवक बाळासाहेब उर्फ आनंद हळदणकर यांच्या प्रयत्नातून ग्रामीण रुग्णालय चंदगड च्या गेट जवळ 'विनंती एसटी बस थांबा' मंजूर झाला आहे. येथील फलकाचे अनावरण आज गुरुवार दिनांक २९/०८/२०२४ रोजी ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले.
चंदगड तालुक्यातील एकमेव ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे आहे. येथे तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची मोठी वर्दळ असते. तथापि या आजारी रुग्णांना दवाखान्यात येण्यासाठी चंदगड येथील खालच्या स्टॅंडवर किंवा डेपो कडील स्टॅंड वर उतरून रुग्णालयापर्यंतची पायपीट करावी लागत होती. अनेक वर्षांपासून येथे एसटी थांबा व्हावा अशी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची अपेक्षा होती. पण लक्ष देणार कोण? ही अवस्था होती. ग्रामीण रुग्णालय समोरूनच चंदगड डेपोकडे जाणाऱ्या सर्व मार्गावरील गाड्या धावत असल्या तरी नियमित एसटी थांबा नसल्यामुळे येथे गाडी थांबवण्यास चालक वाहक तयार होत नसत. परिणामी रुग्ण व नातेवाईकांसह हिंडगाव रोड परिसरातील प्रवाशांची कुचंबणा होत होती. ही समस्या समाजसेवी वृत्तीच्या बाळासाहेब हळदणकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच चंदगडचे प्रभारी आगार व्यवस्थापक सुरेश शिंगाडे यांची भेट घेऊन ग्रामीण रुग्णालयाजवळ एसटी थांब्याची गरज पटवून दिली. यावरून शिंगाडे यांनी विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून याबाबतचे सोपस्कार पूर्ण करत ग्रामीण रुग्णालय च्या खालील गेट जवळ एसटीचा विनंती थांबा मंजूर केला. या फलकाचे उद्घाटन आज नगरसेवक बाळासाहेब हळदणकर, प्रवीण जाधव, सत्तार शहा, अशोक माडेकर, नागेश प्रधान, कलीम मदार, संगम नेसरीकर, मारुती जांबरेकर, गुरुनाथ मंडलिक व ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी उपस्थित होते. यामुळे रुग्ण त्यांचे नातेवाईक व प्रवासी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन चंदगड आगाराचे नूतन व्यवस्थापक सतीश पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment