कोवाड येथे महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात रोष व्यक्त करताना संतप्त नागरिक
चंदगड : सी एल वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथील बाबू विठोबा वांद्रे या शेतकऱ्याचा शेतात खत टाकण्यासाठी गेला असता तुटलेल्या विजेच्या तारेमुळे मृत्यू झाला. २२ ऑगस्ट २०१४ रोजी घडलेल्या या घटनेमुळे वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराची लक्तरे पुन्हा एकदा चव्हाट्यावर अडकवली गेली आहेत. या घटनेमुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांत प्रचंड संताप व्यक्त होत आहे. संतप्त ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या कोवाड येथील कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त करत निवेदनाद्वारे नुकसान भरपाईची मागणी केली.
महावितरण कंपनीच्या चुकांमुळे गेल्या काही वर्षात चंदगड तालुक्यात अनेक दुर्घटना घडल्या आहेत. कंपनीच्या चुकांमुळे दुर्घटना झालेली स्पष्ट दिसत असतानाही सुरुवातीचा लोकक्षोभ शांत होईपर्यंत कंपनी अधिकारी पडती भूमिका घेतात. काही दिवसात प्रकरण शांत झाले की निर्लज्जपणे आपला या दुर्घटनेशी काही संबंध नाही असा पवित्रा घेत प्रकारे हात वर केले जातात. मनुष्य व प्राण्यांच्या रक्ताला चटवलेल्या वितरण कंपनीला सामूहिकरीत्या धडा शिकवणे गरजेचे असल्याची चर्चा कोवाड येथील आज दि २४ रोजी झालेल्या निषेध मोर्चाच्या वेळी व्यक्त होत होती.दरवर्षी शॉर्ट सर्किटमुळे चंदगड तालुक्यात उसाच्या फडांना आग लागून लाखोंचे नुकसान होते. गेल्याच आठवड्यात लकीकट्टे येथे खांबातून आर्थिंग मधून परिसरात जमिनीमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता. यात जवळच चरणाऱ्या चार म्हशींचा तडफडून मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत बाबू मुंगारे या शेतकऱ्याचे सुमारे चार लाखांचे नुकसान झाले. मजरे जट्टेवाडी येथे घराला आग लागली होती. गतवर्षी बुक्कीहाळ बुद्रुक येथील एका तरुणाचा शॉक लागून बळी गेला होता. ग्राहकांकडून दरमहा हजारोंची बिले आकारणाऱ्या कंपनीचे कर्मचारी किरकोळ दुरुस्ती व कामांसाठी जादाची चिरीमिरी घेतल्याशिवाय हालत नाहीत. कोवाड परिसरात अनेक डीपी पेट्या उघड्या आहेत, अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तारांमध्ये गुंतले आहेत तर काही ठिकाणी डीपी व पोलवरील तारापर्यंत जिवंत वेली गुरफटून गेल्या आहेत. गावठाण, कृषी पंप, ठिकठिकाणी वाकलेले खांब अशा अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. एक महिना जरी विज बिल थकले तरी विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी येणारे कर्मचारी इकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करतात व त्यांना कार्यालयातील अधिकाऱ्यांची फूस असते असा आरोप ग्राहकांतून होत आहे. कंपनी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली वर्तणूक व कारभार यात सुधारणा न केल्यास ग्रामस्थ व ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. असा इशारा देत सहाय्यक अभियंता अजित कांबळे यांची तात्काळ बदली करण्याची मागणी निवेदनाद्वारे कोवाड पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी महावितरण कंपनीला दिली आहे. हे निवेदन गडहिंग्लज चे कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके यांनी स्वीकारले. यावेळी विष्णू आडाव, अजित व्हन्याळकर, तालुका संघाचे संचालक राहुल देसाई, प्रा. दीपक पाटील, कल्लाप्पा वांद्रे, संभाजी आडाव, जानबा कांबळे, अशोक मनवाडकर, महेश मुळीक व ग्रामस्थ,शेतकरी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment