शिवरायांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार करणारे सरकार लाडक्या खुर्चीसाठी लाचार ...! -राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

02 September 2024

शिवरायांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार करणारे सरकार लाडक्या खुर्चीसाठी लाचार ...! -राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

चंदगड येथे राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

    भ्रष्टाचाराच्या दलदलीत आखंठ बुडालेले महाराष्ट्रातील महायुती सरकार सध्या लाडक्या खुर्चीसाठी लाचार बनले आहे. त्यांच्या भ्रष्टाचारी कामामुळे मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा आठ महिन्यांत कोसळतोय हे त्याचेच ज्वलंत उदाहरण आहे. 

   छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्यात बहिण सुरक्षित होती. पण सध्याच्या महायुतीच्या राज्यात लाडकी बहीण असुरक्षित झाली आहे. बहिणींच्या मतांवर डोळा ठेवून लाडकी बहीण योजना राबवण्याऐवजी या भगिनींना संरक्षण देण्याची गरज आहे. सुरू केलेल्या योजना आम्ही बंद पाडणार नाही कारण काँग्रेसच्या काळातल्या योजना अजूनही चालू आहेत. त्यामुळे जनतेने त्याची चिंता करू नये. असे प्रतिपादन राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंदगड येथे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी केले.  

         जयंत पाटील पुढे म्हणाले, गद्दारी आणि भ्रष्ट्राचाराने महाराष्ट्र बदनाम झाला आहे. अडचणीत असणाऱ्या राज्याला आता सामान्य माणूसच वाचवू शकणार आहे. सर्वांनी आपला आशीर्वाद महाविकास आघाडीला द्यावा असे आवाहन केले. आज महिला सुरक्षित नाहीत. आमच्या लहान मुली शाळेत जाताना पूर्ण सुरक्षित जातील की नाहीत याची खात्री देता येत नाही. आमचे सरकार आल्यानंतर महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जातील. आणि महाराष्ट्रामध्ये कुठल्याही आमच्या भगिनींच्या केसाला धक्का लागणार नाही असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला पुन्हा महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपली महाविकास आघाडी संघटित पणाने काम करील असे सांगितले. यावेळी नंदिनी बाभुळकर म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकार नक्कीच येणार आहे. बाबासाहेब कुपेकरांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे. 

    यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, विष्णू गावडे, गणेश फाटक, शिवाजी सावंत यांची भाषणे झाली. यावेळी रोहित पाटील, राजेंद्र परिट, प्रमोद कांबळे, अमर चव्हाण, उदय देसाई, रामराजे कुपेकर, शुश्रुत बाभुळकर, शिवप्रसाद तेली उपस्थित होते. भैरू खांडेकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment