अवसायनात गेलेली कालकुंद्रीतील दूध संस्था सभासदांच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू - चंदगड लाईव्ह न्युज

02 September 2024

अवसायनात गेलेली कालकुंद्रीतील दूध संस्था सभासदांच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू

 

अवसायनात गेलेली कालकुंद्री येथील कामधेनु दूध संस्था पुन्हा सुरू केल्यानंतर सभासद व हितचिंतक

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

       कालकंद्री (ता. चंदगड) येथील श्री कामधेनू महिला सहकारी दूध संस्था व कृषी पूरक सेवा संस्था तत्कालीन चुकीच्या कारभारामुळे बंद पडून अवसायानात गेली होती. संस्थेची स्व मालकीची इमारतही संबंधित विभागाकडून लिलावाची प्रक्रिया सुरू झाली होती. तथापि ही संस्था पुन्हा चालू करण्याचा चंग संस्थेच्या सभासदांनी बांधला व त्याला अखेर यश आले. 

       संस्था सुरू करण्याच्या परवानगी मुळे उत्साहीत झालेल्या दूध उत्पादक सभासदांनी अखेर ३० ऑगस्ट २०२४ रोजी दूध संकलन करून संस्थेचे पुन्हा विधिवत उद्घाटन केले. संस्था अवसायनात गेल्यामुळे पूर्वीचे संचालक मंडळ बरखास्त झाले आहे. त्यामुळे संस्थेवर सध्या प्रशासकीय कारभार असून केडीसीसी बँकेचे निरीक्षक जनार्दन खवणेवाडकर यांची प्रशासक म्हणून नेमणूक आहे. थोड्याच दिवसांत सभासदांतून नवीन संचालक मंडळ नेमण्याचा मार्ग मोकळा होईल असे समजते. अवसायनात गेलेली संस्था पुन्हा सुरू करण्याचा पराक्रम कालकुंद्री मधील या सभासदांनी करून अशी संस्था पुन्हा सुरू करता येते, हे तालुका व जिल्ह्यातील सभासदांना दाखवून दिले आहे. 

      ही अशक्यप्रयोग गोष्ट साध्य करण्यासाठी शंकर रामा कोकितकर, अनंत गोविंद पाटील, गुरुनाथ यल्लाप्पा पाटील, यल्लाप्पा दत्तू पाटील, अरविंद गोविंद पाटील, कल्लाप्पा रामचंद्र पाटील, मारुती शंकर पाटील- कलागते, प्रशांत रामचंद्र पाटील आदींनी परिश्रम घेतले. त्यांना विनोद अशोक पाटील यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment