कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथे जलजिवन मिशन अंतर्गत बांधलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ६ डिसेंबर २३ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यासंदर्भात १३ डिसेंबर २३ रोजी सदर पाण्याची टाकी पडण्याचा आदेश काढला. मात्र आजपर्यंत संबधित प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्याने कोवाड (ता. चंदगड) मधील ग्रामस्थ संबधित प्रशासनाच्या निषेधार्थ आजपासून (ता. ३) साखळी उपोषण सुरु केले आहे.
प्रत्येकाला नळाच्या पाण्याचे कनेक्शन देण्याच्या उद्दिष्टाने पंतप्रधान जल जीवन मिशन २०१९ ला सुरू केले होते. जल जीवन मिशनचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण भारतातील सर्व घरांना दीर्घ कालावधीसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करणे आहे. २०२४ पर्यंत वैयक्तिक नळ कनेक्शनद्वारे शुद्ध, सुरक्षित आणि पुरेसे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे.
सद्य स्थितीत कोवाड गावातील जुन्या पाणी पुरवठा व्यवस्था व्यतिरिक्त सन २०२२-२३ मध्ये २८-०९-२०२२ रोजी जलजिवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना सुधारणा करणे कामी १ कोटी ७४ लाख रुपयांच्या तांत्रिक निधीला मान्यता मिळाली होती. पाण्याच्या टाकी बांधकाम बाबतच्या त्रुटी तसेच कामाच्या दर्जा बाबत ठेकेदाराविरुद्ध संबंधित खात्याकडे तक्रार होऊन सदर योजना रखडल्याने ही योजना देखील अधांतरीच असल्याचे चित्र आहे. तरी सदर योजना ही लवकरात लवकर कार्यान्वित होण्याकडे संपूर्ण ग्रामस्थांचे डोळे लागले आहेत. या योजने मुळे पूर परिस्थितीत देखील पाण्याची होणारी अडचण दूर होण्यास मदत मिळणार आहे.
कोवाडकरांसाठी इतकी पाणी व्यवस्था असतानादेखील `असून अडचण नसून खोळंबा` अशी गत झाली आहे. त्यामुळे सदर आदेशाची कार्यवाही होण्यास विलंब झाल्याने अखेर ग्रामस्थांच्या वतीने राहुल देसाई, जानबा गावडे, अजित व्हन्याळकर, बडकु आडाव, चंद्रकांत कुंभार, गोपाळ जाधव, शंकर पाटील, विजय सोनार, संभाजी आडाव, अभिजित व्हन्याळकर, जोतिबा आडाव या ग्रामस्थांनी उपोषण सुरु केले आहे.
No comments:
Post a Comment