रेबीज हा जीवघेणा आजार, परंतु सहज टाळू शकतो - तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ - चंदगड लाईव्ह न्युज

27 September 2024

रेबीज हा जीवघेणा आजार, परंतु सहज टाळू शकतो - तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ

 


तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा

         रेबीज हा एक विषाणूजन्य(viral) आजार आहे. दरवर्षी 28 सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज आजाराविषयी जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो  नागरिकांनी पुढील प्रमाणे काळजी घेतल्यास हा धोकादायक असणाऱ्या आजारावरही आपण मात करू शकतो अशी माहिती चंदगड तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यांनी चंदगड लाईव्ह शी बोलताना दिली. डॉ सोमजाळ यांनी या  जीवघेण्या आजारा संदर्भात पुढील प्रमाणे माहिती दिली .

 A)रेबीज आजार कशामुळे होतो -

सदरील आजार हा रेबीज बाधित कुत्रा, मांजर, कोल्हा, माकड व इतर जंगली प्राणी चावल्यामुळे त्यांच्या लाळेद्वारे चावलेल्या व्यक्तीच्या जखमेतून संपूर्ण शरीरामध्ये पसरतो 

B) रेबीज आजाराची लक्षणे -

1)रेबीज आजार झाल्यानंतर रुग्णास पाण्याची व उजेडाची भीती जाणवते तसेच तो नेहमी अंधाऱ्या खोलीत राहणे पसंत करतो

2)पाणी पिताना त्रास होणे, तोंडातून जादा प्रमाणात लाळ गळते

3)ताप व डोकेदुखी, मेंदू व मज्जा तंतू वर कालांतराने आघात होऊन रुग्ण दगावतो

4)रेबीज ने बाधित प्राणी चावलेला असेल तर साधारणपणे दोन ते तीन महिन्यापर्यंत व क्वचित एक वर्षापर्यंत सुद्धा रेबीजची लक्षणे दिसू शकतात

 C) रेबीज आजार कसा टाळता येईल -

1) वरील नमूद केल्याप्रमाणे पाळीव किंवा जंगली प्राणी चावल्यास तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात संपर्क साधावा, वैद्यकीय अधिकारी आपणास झालेली जखम, व शरीराच्या कोणत्या भागावर जखम झालेली आहे हे पाहून त्याचे वर्गीकरण करतात व आवश्यकतेनुसार अँटी रेबीज व्हॅक्सिन(ARV) इंजेक्शन दंडामध्ये दिले जाते.

2) साधारणपणे पाच इंजेक्शन चावलेल्या दिवसापासून(  0 दिवस म्हणजे पहिले इंजेक्शन घेतलेला दिवस, तिसऱ्या दिवशी,सातव्या दिवशी,चौदाव्या दिवशी व 28व्या दिवशी) इत्यादी दिवशी दिले जाते, सदरील इंजेक्शन शासकीय दवाखान्यात पूर्णपणे मोफत आहे

3) कुत्रा व इतर प्राणी चावल्यामुळे झालेली जखम साबण वापरून नळाच्या वाहत्या पाण्यामध्ये पंधरा मिनिटापर्यंत स्वच्छ धुवावे जेणेकरून जखमेमध्ये असलेले रेबीजचे विषाणू कमी होण्यास मदत होते 

4)जखमेला निर्जंतुक मलम लावावा जखम घट्ट बांधू नये 

5) जखमेला मिरची तेल चुना असे कोणतीही घातक पदार्थ लावू नये 

6)शक्य असल्यास आपल्या घरातील पाळीव प्राण्यांचे वेळोवेळी रेबीज विरोधी लसीकरण करून घ्यावे 

7)डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे रेबीज विरोधी लशीचे वेळापत्रक तंतोतंत पालन करावे 

आपल्याला पाळीव अथवा जंगली प्राणी चावल्यानंतर वरील प्रमाणे लस घेतल्यास व काळजी घेतल्यास निश्चित आपल्याला रेबीज आजाराला आपण प्रतिबंध करू शकतो.

अशा प्रकारे काळजी घेतल्यास नक्कीच आपण आपले प्राण वाचवू शकतो असे डॉ सोमजाळ  यानी सांगीतले.

No comments:

Post a Comment