होसूर येथे पर्यावरण पूरक 'सत्व सिद्धी निर्मित गणेश' मूर्तीला मिरवणुकीने निरोप - चंदगड लाईव्ह न्युज

17 September 2024

होसूर येथे पर्यावरण पूरक 'सत्व सिद्धी निर्मित गणेश' मूर्तीला मिरवणुकीने निरोप

 


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

       होसुर (ता. चंदगड) येथे 'सत्वसिद्ध पर्यावरण पूरक गणेश' मूर्तींचे पूजन सन २०२१ पासून सुबराव पवार यांच्या घरी केले जाते. सध्या गावातील अनेक घरी या मूर्तीचे पूजन सुरू आहे. 

   या मूर्ती कंथेवाडी (ता. राधानगरी) येथील मूर्तिकार मारुती पाटील तयार करतात. मूर्तीचे खास वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीमध्ये अष्ट महा औषधी वनस्पती जसे सहदेवी, वच्या, व्याघ्री, बला, अतीबला, शंखपुष्पी, सिही, सुवर्चला तसेच घटक द्रव्यांमध्ये तुळस, अश्वगंधा, पंचगव्य (दूध, तूप दही, गोमाई, गोमूत्र), गेव्हू, ताम्रभस्म, सुवर्ण भस्म, सप्तरंगी पासून ही मूर्ती तयार केली जाते. या मूर्तीमध्ये दह्यापेक्षा ८ पट अधिक प्रथिने, केळीपेक्षा १४ पट अधिक पोटॅशियम, पालक पेक्षा २३ पट अधिक लोह, दुधापेक्षा १६ पट अधिक कॅल्शियम, गाजरापेक्षा ९ पट अधिक अ जीवनसत्व इतकी या मूर्तीची क्षमता आहे.

       ही मूर्ती रोग प्रतिकार शक्ती वाढवते त्वचारोग, किडनी विकार, मधुमेह यासारखे आजार नियंत्रणात राहण्यास मदत होते.  या मूर्तीची खास वैशिष्ट्ये म्हणजे आयुर्वेदिक घटकापासून तयार केलेली गणेशमूर्ती खूपच प्रभावशाली आहे. मूर्तीमध्ये असणाऱ्या घटकांमुळे ९८ ग्रॅम फॉस्फरस, १०५ ग्रॅम कॅरोटीन, जीवनसत्वे त्याचबरोबर लोह प्रथिने आढळतात. अशी गणेश मूर्ती पाण्यात विसर्जन केल्यानंतर १ हजार ते १० हजार लिटर पाणी शुद्ध होते. जलचर प्राणी, मासे यांची प्रजनन क्षमता वाढविण्यास मदत होते. ते सक्षम होतात. ह्या गणपती मूर्ती नैसर्गिक माती पासून बनवलेल्या असून पूर्णतः पर्यावरण पूरक आहेत. या शिवाय मूर्तींमध्ये आयुर्वेदिक औषधी घटक वापरले असून मूर्ती विसर्जनानंतर ७२ तासांत पाणी शुद्ध होण्यास मदत होते. 

      शाडूची माती, पंचगव्य,आयुर्वेदिक वनस्पती, मुलतानी माती, हळद, गेरू  इत्यादी घटक वाहत्या नदीत विसर्जन केल्यानंतर नदीतील पाणी शुद्ध होईल जलचर प्राण्यांना खाद्य मिळून कोणताही त्रास होणार नाही. होसुर येथे यंदा सुबराव पवार, अमोल देसाई,  मारुती वर्पे, ज्योतिबा नाईक आदी भाविकांनी मूर्तींचे स्वागत भजनाने तर  अनंत चतुर्दशीला महिला लेझीम पथकाच्या गजरात सवाद्य निरोप देण्यात आला.  

      पर्यावरण पूरकगणेश मूर्तींचा प्रचार व प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांनी पर्यावरण पूरक सण साजरे करावेत याकरिता होसुरमध्ये गेले चार वर्षे सातत्याने हा कार्यक्रम सुबराव रामचंद्र पवार यांच्या कुटुंबीयांमार्फत राबविला जात आहे. याकामी शिवाजी गुंडू नाईक आदींचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment