पगारवाढ एसटी कामगारांना, दिलासा प्रवाशांना.....! पगारवाढ मिळाल्याने एसटी कर्मचारी संप मागे - चंदगड लाईव्ह न्युज

05 September 2024

पगारवाढ एसटी कामगारांना, दिलासा प्रवाशांना.....! पगारवाढ मिळाल्याने एसटी कर्मचारी संप मागे



चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 
 राज्यातील एसटी कामगारांनी  दोन दिवसांपासून पुकारलेला संप आज दि. ४/९/२०२४ रोजी सायंकाळी मागे घेतला. मुंबईतील सह्याद्री अतिगृहावर एसटी कामगार संघटना आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या झालेल्या बैठकीत संपावर योग्य तोडगा काढल्यामुळे हा संप मागे घेण्यात आला. एसटी कामगारांच्या पगारात वाढ करण्याची मागणी शासनाने मान्य केली आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात सुमारे साडेसहा हजार रुपये पर्यंत वाढ होणार आहे.
   ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसल्यामुळे राज्यातील एसटी सेवा कोलमडली होती. त्याचा सर्वाधिक फटका गणेशोत्सवानिमित्त आपापल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना बसत होता. एसटी बंद झाल्यामुळे खाजगी ट्रॅव्हल्स बस वाहतूकदारांनी आपले दर नेहमीपेक्षा तिपटीने वाढवले आहेत. मुंबईवरून कोकणात किंवा कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यासाठी असलेल्या ६०० ते ७०० रुपये दरावरून १६०० ते १७०० रुपये तिकीट दर आकारले जात आहेत. त्यामुळे चाकरमान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. एसटी बंद झाल्यामुळे जनसामान्यांतून शासनावर टीकेचे सूर उमटत होते 
   त्यातच भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी या महाराष्ट्र दौऱ्यावर असतानाच संप पुकारल्यामुळे शासनाची व प्रशासनाची मोठी धांदल उडाली होती. एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारी ही वाढ १ एप्रिल २०२० पासून मूळ वेतनात सुमारे ६५०० रुपये पर्यंत मिळणार असल्याने एसटी कर्मचाऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. हा संप मिटल्यामुळे एसटी कामगारांपेक्षाही अधिक दिलासा पुणे, मुंबई, ठाणे अशा शहरातून गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाण्यासाठी ताटकळत बसलेल्या चाकरमान्यांना मिळाला आहे. एसटी अभावी अडकून पडलेल्या प्रवाशांनी हा संप मिटल्यामुळे सुटकेचा निस्वास टाकला आहे.

No comments:

Post a Comment