सार्वजनिक मंडळाची गणेश मूर्ती ट्रॅक्टर मधून येताना कार्यकर्ते |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यात गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी दुपारपर्यंत घरगुती गणेश आगमनाचा उत्साह शिगेला पोचला होता. पारंपरिक वस्त्रे परिधान करून अबालवृद्ध भाविक सहकुटुंब गणेश मूर्ती आणताना दिसत होते. सकाळी नऊ नंतर मूर्ती आणण्यासाठी मूर्तिकारांच्या कार्यशाळेमध्ये भाविकांची गर्दी वाढली ती दुपारी एक वाजेपर्यंत सुरू होती.
घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करून दुपारनंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते ट्रॅक्टर, टेम्पो अशी विविध वाहने घेऊन मूर्तिकारांच्या घरी घोळक्याने जाताना दिसत होते. सायंकाळी पाच वाजल्यापासून सार्वजनिक मूर्ती मिरवणुकीने नेताना कार्यकर्त्यांचा जल्लोष ओसंडून वाहत होता. दरवर्षी पाच दिवस असणारा घरगुती गौरी गणपतीचा मुक्काम यंदा एक दिवस जादा राहणार असून सार्वजनिक गणपतीही दहा ऐवजी अकरा दिवस मुक्कामी असल्याने गणेश भक्तांत आनंदाचे वातावरण आहे.
चंदगड तालुक्यात पूर्वी गावोगावी अनेक मूर्तिकार गणेश मूर्ती बनवत तथापी गेल्या १०-२० वर्षात बाहेरून तयार मूर्ती आणून विक्री करण्याकडे कल वाढला आहे. तालुक्याच्या पूर्व भागात माणगाव, कोवाड, कागणी, कुदनूर, दुंडगे, चिंचणे येथील मूर्तिकार मोठ्या संख्येने सुबक मूर्ती बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. घरगुती छोट्या मूर्तींसह सार्वजनिक मंडळाच्या मोठ्या मूर्तीही येथे तयार होत असल्याने दूरवरून येथे मूर्ती नेण्यासाठी भाविक येत असतात. यंदा गणेश मूर्तींच्या किमतीही गतवर्षीच्या तुलनेत दीडपटीने वाढल्याची चर्चा व नाराजी दिसत होती. आज पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतल्यामुळे श्रींच्या आगमनाचा उत्साह आणखी वाढला होता. गावोगावी पारंपरिक व बेंजो पथक, गणपती बाप्पा मोरया च्या गजरात घरगुती गणपतींचे आगमन सुरू होते.
No comments:
Post a Comment