'ताम्रगड' मार्फत कर्यात भागात स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र दि ८ रोजी उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

06 September 2024

'ताम्रगड' मार्फत कर्यात भागात स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र दि ८ रोजी उद्घाटन

 


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

    गेल्या काही वर्षात चंदगड तालुक्यात विविध लोकोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या ताम्रगड प्रतिष्ठानच्या वतीने कर्यात भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहे. कोवाड, ता चंदगड येथील राजीव गांधी पतसंस्था इमारत दुसरा मजला, एसटी स्टँड किणी-कोवाड येथे सुरू होणाऱ्या या केंद्राचे उद्घाटन रविवार दि ८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

   भागातील विद्यार्थ्यांना विविध परीक्षांची तयारी करता यावी. त्यांना शासकीय, प्रशासकीय अथवा नामवंत कंपन्यांमध्ये सेवेची संधी मिळावी यासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा व योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी 'ताम्रगड प्रतिष्ठान चंदगड' यांच्या माध्यमातून सुसज्ज अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र सुरू होत आहे.  

  कै रामचंद्र सट्टूप्पा पाटील (रा स पाटील गूरूजी) नागरदळे यांचे स्मरणार्थ 'रामू मास्तर अभ्यासिका' तर प्राचार्य कै डॉ डी व्ही तोगले, किणी (माजी अध्यक्ष सर्वोदय शिक्षण संस्था कोवाड) यांचे स्मरणार्थ 'तोगले सर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र' म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. 

   केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी विनोद देसाई (राज्य कर सहा. आयुक्त, मुंबई व अध्यक्ष महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ मुंबई), सुधीर नाकाडी (वित्त संचालक, मंत्रालय, मुंबई), श्रीमती मंगलाबाई दत्तात्रय तोगले, श्रीमती शांताबाई रामचंद्र पाटील, डॉ मनोज तोगले (एमएस, केएलई, बेळगाव), जाँर्ज क्रूज (विजयश्री ॲकॅडमी कोल्हापुर), पी बी पाटील (चेअरमन राजीव गांधी पतसंस्था), प्रा सुखदेव शहापुरकर (माजी सरपंच कुदनूर), विष्णू बागिलगेकर (कोवाड शाखा चेअरमन) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सामाजिक उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी कर्यात भागातील विद्यार्थी, पालक, हितचिंतकांनी मोठ्या उपस्थित रहावे असे आवाहन ताम्रगड प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment