चंदगड : सी एल वृत्तसेवा
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या पुरस्कर्ता व पुरोगामी समजला जाणारा किणी, कोवाड, कालकंद्री, कुदनूर, निट्टूर, कागणी आदी ३०-३५ गावांचा कर्यात भाग गेल्या काही वर्षात अंधश्रद्धेच्या विळख्यात गुरफटताना दिसत आहे. परिसरातील रस्ते, तिट्टे व चौक भोंदू बाबांच्या सांगण्यावरून केलेल्या करणी उताऱ्यांनी ओसंडून वाहत आहेत. हे दृश्य पाहून कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड (ता चंदगड) च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 'तिट्ट्यावरील करणी' हा प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात आला.
प्राचार्या डॉ एम एस पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा आर डी कांबळे यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी सत्यशोधक वृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करुन वास्तववादी जीवन जगावे असे आवाहन केले. प्रकल्प अधिकारी प्रा दीपक पाटील यांनी करणी करुन रस्त्यावर टाकलेल्या बुट्टीतील नारळ, लिंबू, केळी, बीब्बे या वस्तू काढून दाखवल्या. महाराष्ट्रात संत गाडगेबाबांनी गावोगावी फिरून किर्तन व वर्तनातून बहुजन समाजाला अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी व स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी आयुष्य खर्ची घातले. अंधश्रद्धेच्या नादाला लागून बरबाद होऊ नका, यात्रा, जत्रा व देवांच्या नावाखाली कोंबडे बकरे कापू नका, देवाला नवस करून करणी, भानामती करून आजार कमी होत नाहीत त्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे अशी शिकवण दिली. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात आज भोंदू बाबांचे पेव फुटले आहे. अशा भोंदूंच्या नादी लागून अनेक कुटुंबे बरोबर झाली आहेत व होत आहेत हे टाळले पाहिजे. महाराष्ट्रातील महापुरुषांची शिकवण विसरून अलीकडच्या काळातील व्हीआयपी बुवा बाबांच्या नादी लागून करणी, भानामती सारख्या भंपक गोष्टींच्या नादी लागून हजारो रुपयांची बरबादी करत आहेत. हे थांबले पाहिजे असे सांगताना विद्यार्थ्यांनी चौकस व वैज्ञानिक दृष्टिकोनातून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्राध्यापक उपस्थित होते.
कोवाड महाविद्यालयाच्या वतीने परिसरातील रस्ते व तिट्ट्यावरील टाकलेले करणी उतारे विद्यार्थ्यांना दाखवताना प्रा दीपक पाटील, आर डी कांबळे व विद्यार्थी
No comments:
Post a Comment