तिलारीनगर दोडामार्ग घाटातील वळणावर अडकलेला कंटेनर |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
तिलारीनगर दोडामार्ग घाटातील तीव्र वळणावर रस्त्याच्या मधोमध पुन्हा एकदा मोठा कंटेनर अडकल्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक कालपासून (सुमारे २४ तास) ठप्प झाली आहे. अपघातग्रस्त ठिकाणाच्या दोन्हीकडे वाहने अडकून पडली. परिणामी वाहनधारक व प्रवाशांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागला.
धोकादायक पद्धतीने कंटेनरच्या बाजूने मार्ग काढण्याचा प्रयत्न करणारी वाहने. |
रस्ता अरुंद असल्यामुळे वाहने वळवून माघारी घेणे ही अवघड असल्याने वरची वाहने वर व खालची खाली अडकली. काल २९ रोजी दुपारनंतर अडकलेला कंटेनर ३० रोजी दुपारपर्यंत क्रेन उपलब्ध न झाल्याने जैसे थे होता.
१ जुलै पासून जिल्हाधिकाऱ्यांनी येथील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्याचे आदेश देऊनही बंदी आदेश पायदळी तुडवून मोठी वाहने सुसाट धावत आहेत. मोठी वाहने वळणावर अडकणे, अपघातग्रस्त होणे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. क्रेन च्या साह्याने अशी वाहने काढण्यात बरेच तास निघून जातात. यामुळे अडकून पडलेल्या वाहनधारक व प्रवाशांचे पुढचे नियोजन कोलमडून पडते. परिणामी मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.
वाहतूक बंदीची कठोर अंमलबजावणी करण्याची अनेक वेळा मागणी होऊनही उत्तर कर्नाटकातील विजापूर, रायचूर सह आंध्र प्रदेशातून येणारी अनेक अनोळखी वाहने गोव्याकडे जातांना या धोकादायक घाटात अडकून पडतात किंवा अपघातग्रस्त होतात. यात बऱ्याच वेळा जीवित व वित्त हानी होते. याला जबाबदार कोण? गुगल की पोलीस व बांधकाम विभाग? असा सवाल त्रस्त प्रवासी व छोट्या वाहनधारकांनी केला आहे. पोलीस खाते व सार्वजनिक बांधकाम खाते चंदगड यांनी येथील वाहतूक बंदीच्या अंमलबजावणी साठी कठोर उपाययोजना करावी तसेच अवजड वाहने बंद करून एसटी बस सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment