घरगुती गणेश विसर्जन वेळी तारेवाडी - हडलगे बांधऱ्याजवळ मोठया प्रमाणात अस्ताव्यस्त पडलेला कचरा गोळा करतानानेसरीतील सामाजिक कार्य समिती
नेसरी / सी एल वृत्तसेवा
नेसरी (ता. गडहिग्लज) येथील सामाजिक कार्य समितीच्या वतीने हडलगे नदीघाटावरील स्वच्छता करून सामाजिक बांधिलकी जपली. गुरुवारी (दि. १२) रोजी तारेवाडी- हडलगे बांधाऱ्यावर घरगुती गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी नेसरीसह तारेवाडी, हडलगे, तळेवाडी आदी गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
घटप्रभा नदीत गणेश मुर्तींचे विसर्जन केल्यानंतर निर्माल्य, नैवेद्य व प्लास्टिक कचरा नदी घाटावर मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त पडला होता. याठिकाणी एकत्र कचरा गोळा करण्याची कोणतीही व्यवस्था कुणीही केली नसल्याने नदीघाटावर सर्वत्र कचरा पडल्याचे दृश्य होते. नदी प्रदूषणाला अशा गोष्टी मारक ठरतात हे ओळखून शुक्रवारी सकाळी नेसरीतील सामाजिक कार्य समितीच्या तरूणांनी नदी घाटावर जाऊन निर्माल्य व अस्त्याव्यस्त पडलेला प्लास्टिक सह सर्व प्रकारचा कचरा एकत्र गोळा करून परिसर स्वच्छता केली. सुमारे अर्ध्या टनाहून अधिक कचरा गोळा केला.
या उपक्रमात सामाजिक कार्य समितीचे अध्यक्ष व पत्रकार रवींद्र हिडदुगी, अमोल बागडी, अभिजित कुंभार, बाळासाहेब नावलगी, आप्पासाहेब कुंभार, सूर्यकांत संकपाळ, गोविंदा नांदवडेकर, बापूसाहेब घवाळे आदी सदस्य सहभागी झाले होते. सन २०१९ चा महापूर, २०२०-२१ मधील कोरोना काळातील सामाजिक कार्य समिति समाजकार्यात अग्रेसर होती. नदी घाटावर स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ व सुंदर झाल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. अशा विधायक कार्यात समाजातील तरुणांसह सर्वांनी सहभागी होण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment