कोल्हापूर - निपाणी - कागल बेळगाव रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षण सुरू - चंदगड लाईव्ह न्युज

15 September 2024

कोल्हापूर - निपाणी - कागल बेळगाव रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षण सुरू

 

संग्रहित छायाचित्र

तेऊरवाडी / एस. के. पाटील

      चंदगडकरांची कोल्हापूर ते चंदगड या मार्गावर रेल्वे सेवा चालू करण्याची जोरदार चळवळ चालू असतानाच  कोल्हापूर ते कागल निपाणी बेळगाव  या नव्या रेल्वेमार्गासाठी (ब्रॉडगेज) प्राथमिक सर्वेक्षण (प्रीलिमिनरी इंजिनिअरिंग अँड ट्रैफिक सर्व्हे) सुरू झाला असल्याने सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या नियोजित रेल्वेमार्गाचा धारवाड-कोल्हापूर रेल्वे कॉरिडोरचा एक भाग आहे. 

         या नव्या मार्गामध्ये बेळगाव-मिरज रेल्वे मार्गावरील परकनहड्डी येथून हा रेल्वे मार्ग सुरू होणार असून, हुक्केरी, संकेश्वर, कणगला, निपाणी, कागल या महत्त्वाच्या ठिकाणांना तो जोडणार आहे.  यासंदर्भात पुणे येथील मोनार्क सन्व्हेयर्स अँन्ड इंजिनिअरिंग कन्सल्टंट लिमिटेड या कंपनीकडे सर्वेक्षणाची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. कोल्हापूर  बेळगाव या रेल्वे मार्गासाठी प्राथमिक सर्वे क्षण करण्याच्या कामास रेल्वे बोर्डाकडून जानेवारी २०२४ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. सहा महिन्यांत या सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्टही निश्चित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने रेल्वे बोर्डाकडून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली होती. आता प्रत्यक्षात सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. या सर्वेक्षणात बेळगाव कोल्हापूर रेल्वेमार्गाची निर्मिती तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे का? याची चाचपणी केली जात आहे. 

           या सर्वेक्षणामध्ये  ड्रोन कॅमेऱ्यांसह उच्च तंज्ञत्रानाचा वापरही केला जात आहे. हा नवा रेल्वेमार्ग तांत्रिक व आर्थिक निकषांच्या आधारे योग्य असेल का? हेसुद्धा सर्वेक्षणात निश्चित केले जात आहे. या रेल्वेमार्गासाठीचा अपेक्षित खर्च, भूसंपादन, भौगोलिक व भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या या रेल्वेमार्गाची निर्मिती शक्य आहे का? याची माहितीही घेतली जात आहे. सुरक्षा, देखभाल व पर्यावरणीय निकषांची पडताळणीही केली जात आहे. बेळगाव व कोल्हापूर ही दोन महत्त्वाची शहरे या नव्या रेल्वेमागनि जोडली जाणार आहेत. त्यामुळे दोन्ही शहरांमधील औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. शिवाय या दोन्ही ठिकाणच्या पर्यटनालाही चांगले दिवस येणार आहेत. सध्या बेळगावहून कोल्हापूरला जाण्यासाठी थेट रेल्वेमार्ग नाही. बेळगावहून मिरज व तेथून कोल्हापूरला जावे लागते. किंवा पुणे-बंगळूर या राष्ट्रीय महामार्ग क्र 4 या महामार्गावरून प्रवास करावा लागतो. या नव्या रेल्वे मार्गामुळे या दोन्ही शहरे जोडली जातील. या नव्या मार्गावरून प्रतितास १६० किमी इतक्या कमाल वेगाने रेल्वे नेता येणार आहे. त्यादृष्टीने रेल्वेमार्गाची निर्मिती केली जाणार आहे. हा मार्ग अस्तित्वात आल्यास बेळगाव-कोल्हापूर हे अंतर कमी वेळेत व कमी खर्चात पूर्ण करता येणार आहे. शिवाय हा रेल्वेमार्ग ज्या लहान शहरांजवळून जाणार आहे, त्यांचाही विकास होणार आहे. धारवाड- कोल्हापूर रेल कॉरीडोरमधील धारवाड- बेळगाव मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

         यामध्येच चंदगडच्या नागरिकांनी चंदगड रेल्वे मार्गासाठी चळवळ चालू केली आहे . यामध्ये २६ ते २४ ऑगष्ट दरम्यान 5 हजार गुगल फॉर्म भरून रेल्वे मार्गाची मागणी केली आहे . एकंदरीत या नव्या रेल्वे मार्गाकडे सर्व चंदगड गडहिंग्लज करांचे लक्ष लागून राहिले आहे.

No comments:

Post a Comment