कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
तिलारी- दोडामार्ग घाटातून सुरक्षेच्या कारणास्तव अवजड वाहतूक बंद करण्याचा आदेश कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी १ जुलै ते ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत काढला. यात अवजड वाहनांसह गेली ४०-४५ वर्षे विना अपघात सुरू असलेल्या एसटी वाहतुकीवर ही बंदी घालण्यात आली. एसटी बस बंद करण्याच्या आदेशामुळे या मार्गावरून होणारी कोल्हापूर, गडहिंग्लज, चंदगड, राधानगरी, कागल आगाराची बस वाहतूक बंद झाली. परिणामी चंदगड, गडहिंग्लज, बेळगाव परिसरातून दोडामार्ग, सावंतवाडी व गोव्यात जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, रुग्ण यांचे अतोनात हाल सुरू आहेत.
दरम्यान बंदी आदेश झुगारून घाटातून एसटी, पेक्षा मोठी व तिप्पट वजनाची विविध राज्यातील वाहने बिनधास्त ये जा करत आहेत. मग केवळ एसटी वरच बंदी का? असा सवाल करत चंदगड व दोडामार्ग तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना दसरा सणापूर्वी एसटी सेवा सुरू करण्याची विनंती केली होती. एसटी सुरू न झाल्यास सोमवारपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला होता त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे आमरण उपोषण आंदोलन सुरू झाले आहे. वरील बाबींचा सारासार विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी घाटातून एसटी बस सेवा तात्काळ सुरू करावी अशी मागणी उपोषणकर्ते तसेच प्रवासी व वाहनधारकांनी केली आहे.
No comments:
Post a Comment