घरात घुसला खतरनाक मन्यार..! कोठे घडली घटना? तीन दिवसांत पकडले विषारी नाग, घोणस व मण्यार - चंदगड लाईव्ह न्युज

22 October 2024

घरात घुसला खतरनाक मन्यार..! कोठे घडली घटना? तीन दिवसांत पकडले विषारी नाग, घोणस व मण्यार

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

      रात्री साडेदहा वाजता झोपायच्या वेळी घरात अचानक खतरनाक मण्यार साप घुसल्यामुळे एकच तारांबळ उडाली. ही घटना घडली चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी येथे.

   ढोलगरवाडी येथील घरात एकटीच असणारी मंजाक्का काल दि. २१/ १०/ २०२४ रोजी रात्री साडे दहा वाजता झोपण्याच्या तयारीत होती. इतक्यात तिच्या अंथरुणाजवळ वळवळणारा खतरनाक मण्यार तिच्या नजरेस पडला. तात्काळ तिने आरडा ओरड करून शेजाऱ्यांना बोलावून घेतले. यावेळी गर्दीतील कोणीतरी गावातच राहणारे सर्पमित्र व ढोलगरवाडी सर्प शाळा विभागप्रमुख प्रा. सदाशिव पाटील यांना फोन केला. पाचच मिनिटात ते मंजक्काच्या घरी दाखल झाले. अंथरुणालगतच थांबलेल्या खतरनाक मण्यार सापाला शिताफीने पकडून प्लास्टिक बरणीत बंद केले. नंतर त्यांनी या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. 

      यावेळी त्यांनी जमलेल्या लोकांना या सापाबद्दल माहिती देताना सांगितले, की हा निशाचर म्हणजे रात्रीच्या वेळी फिरणारा साप असून तो नागापेक्षाही विषारी असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी फिरताना बॅटरीच्या उजेडातच फिरणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तो नेहमी उबदार निवाऱ्याच्या शोधात असल्यामुळे बाहेर थंडी, पाऊस किंवा वातावरण बदलाच्या वेळी अडगळीच्या ठिकाणी येऊन थांबू शकतो.  अशावेळी खबरदारी म्हणून अडगळीच्या ठिकाणचे साहित्य काढताना काळजी घेतली पाहिजे. 

      गेल्या दोन-तीन दिवसात या मण्यार शिवाय त्यांनी परिसरातील आणखी दोन गावांत मानवी वस्तीत शिरलेल्या मला मोठा घोणस व नाग सापाला पकडून रेस्क्यू केले. सदाशिव पाटील यांनी आत्तापर्यंत मनुष्य वस्तीत शिरलेल्या सुमारे साडेपाच हजार विविध जातीच्या सापांना पकडून जीवदान दिले आहे. हा एक विक्रमच म्हणावा लागेल.

No comments:

Post a Comment