दहा वर्षांपासून ओस पडलेल्या इसापूर येथील आरोग्य उपकेंद्राला कायमस्वरूपी कर्मचारी मिळणार का? इसापूर- पारगड परिसरात आरोग्य सेवेची ऐसीतैसी - चंदगड लाईव्ह न्युज

22 October 2024

दहा वर्षांपासून ओस पडलेल्या इसापूर येथील आरोग्य उपकेंद्राला कायमस्वरूपी कर्मचारी मिळणार का? इसापूर- पारगड परिसरात आरोग्य सेवेची ऐसीतैसी

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

     १० वर्षापासून कायमस्वरूपी आरोग्य कर्मचारी नाही. झाडाझुडपांच्या विळख्यात व धूळ खात मृत्यू शय्येवर पडलेली आरोग्यवर्धिनी इमारत, यामुळे परिसरातील आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. ही अवस्था आहे; इसापूर (ता. चंदगड) येथील आरोग्य सेवेची. देशाला जागतिक महासत्ता करण्याची स्वप्ने दाखवणाऱ्या शासनकर्त्या राजकारणी लोकांनी निदान आम्हाला आरोग्य व पाण्यासारख्या मूलभूत सुविधा तरी द्याव्यात. अशी मागणी इसापूर पारगड पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे.

     चंदगड तालुक्याच्या पश्चिम टोकाला सिंधुदुर्ग जिल्हा सिमेलगत, चंदगड पासून ३२ किलोमीटर अंतरावर इसापूर, नामखोल, पारगड व मिरवेल ही सह्याद्रीच्या डोंगर कपारीत लपलेली छोटी छोटी चार गावे आहेत. या परिसरात शिक्षक किंवा शासकीय कर्मचाऱ्यांचे बदली झाली तर त्यांना ती अक्षरशः काळ्यापाण्याची शिक्षा वाटते.  साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी पारगड किल्ल्याची उभारणी केली तेव्हापासून किल्ला परिसरात  वसलेल्या या गावांमध्ये पायाभूत सुविधांची वानवा आहे. २०-२५ वर्षांपूर्वी पक्का रस्ता होईपर्यंत आजारी रुग्ण आडलेली बाळंतीण, सर्पदंशाने मृत्यूच्या घटका मोजणारे रुग्ण यांना येथून २५ किमी अंतरावरील हेरे प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा चंदगड पर्यंत डोली किंवा पाळण्यात बसवून नेले जायचे. या पाच सहा तासाच्या पायपीट प्रवासात रुग्ण व सोबतच्या ग्रामस्थांची काय अवस्था होत असेल? याची कल्पनाच केलेली बरी. सद्यस्थितीत केवळ रस्ते झाले असले तरी प्रवास व वाहतूक सुविधा नसल्याने त्यांचीही असून अडचण... अशीच अवस्था आहे.  १९८६ ते ८८ दरम्यान हेरे पासून पुढे मिरवेल पर्यंत तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने विद्युत सुविधांची पूर्तता केली आहे. मात्र पाणी व आरोग्याचे प्रश्न जैसे थे आहेत. या परिसरातील सर्व गावांचे मिळून एकत्रित मतदान ५०० च्या पुढे नाही. त्यामुळे विकास कामांना मतदारांच्या संख्येची मोजपट्टी लावणारे सर्व राजकीय पक्षांचे पुढारी येथील संविधांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत कमी मतदान असलेल्या आमच्या सारख्या गावांना कोणी वाली आहे की नाही? असा संतप्त सवाल या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केला आहे.

     परिसरातील पारगड- मिरवेल- मोरले रस्ता, पारगड किल्ल्यावर जाणारा रस्ता, ऐतिहासिक किल्ले पारगड वरील पाणी योजना आदी प्रश्नांसाठी गेल्या पंचवीस तीस वर्षात अनेक आंदोलने होऊनही हे प्रश्न रेंगाळले आहेत. पुन्हापुन्हा त्याच मागण्यांसाठी उपोषण आंदोलने करण्याचे त्राण आमच्यात राहिले नाहीत. किंबहुना आंदोलन करण्याचीही आम्हाला लाज वाटत आहे. असे निराशाजनक उद्गार पारगड येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार तसेच ईसापूर पंचक्रोशीतील 'जाणत्या' ग्रामस्थांनी या प्रश्नांबाबत बोलताना व्यक्त केले. आचारसंहितेचा बागुलबुवा पुढे न करता प्रशासनाने येथील रस्ते, पाणी व आरोग्याचे प्रश्न तात्काळ मार्गी लावावे अशी मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment