आजरा - सी एल न्यूज प्रतिनिधी
कारीट /चीराटे/किराटी, कोर्टी, चिर्डी, चिड्डी ही नावेही ऐकलेली आहेत.
धनत्रयोदशीला कातरवेळी दागिन्यांची पूजा करून गोड आणि धन्याचा प्रसाद हातावर मिळाला की समजायचे उद्या पहाटे लवकर उठायचे आहे. या रात्री तसे कोणी झोपतच नाही. घराघरात वाडीवस्तीवर जल्लोष सुरू असतो. कुणी नरकासुर करत असतो तर कुणी घराच्या सजावटीत दंग असतो. माजघरात विविध गंध दरवळत असतात.
खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी लगबग सुरू असते. सर्वसामान्यत: शहर, निमशहरातील ही दैनंदिनी..पण गावागावातही काहीशा फरकाने धनत्रयोदशीची रात्र अशीच जागी असते. कारण भल्या पहाटे अभ्यंग स्नानाबरोबर कारीट फोडायचे असते!
गोविंदा ऽऽ गोपाळा..च्या घोषात कारीटांना तुडविले जाते..
गोविंदा गोपाळा ऽऽचा गजर करत तुळशी वृंदावनासमोर कारीट म्हणजेच चिरूटे फोडायचे. सूर्योदय होण्यापूर्वी अभ्यंगस्नान उरकायला हवे. हा रिवाज कसोशीने जपला जातो. मध्यरात्रीपासूनच न्हाणी घरात विस्तव धडधडत असतो. मध्यरात्री नरकासुराचे दहन केल्यानंतर (अलीकडे नरकासुर जाळण्याची परंपरा गावागावातही जोर धरत आहे. शहरात असणारी नरकासुर स्पर्धेचे लोळ गावातही पोहोचले आहेत.) तरुण मंडळी घरात परतात ती अभ्यंगस्नानासाठीच.
अमृत प्रहरी म्हणजे तीन ते चारच्यादरम्यान कोंबडा बांग देतो. ही कोंबडय़ाची बांग ऐकतानाच भल्या पहाटे गोविंदा ऽऽ गोविंदा ऽऽ गजर कानावर येऊ लागतो. गावातील काही उत्साही मंडळी कोण पहिले कारीट फोडणार अशी स्पर्धाही लावत असतात. एकूणच या उत्साहात उटणे लावून आंघोळ सुरू होते आणि ओल्या अंगाने कारीट घेऊन तुळशी वृंदावनासमोर प्रत्येक जण दाखल होतो. जणूकाही आपणच नरकासुराचा वध करणार आहोत अशा इष्रेने हे कारीट काही जण अंगठय़ाखाली तर काही जण खोटेखाली धरून गोविंदाच्या गजरात फोडत असतात. या फोडलेल्या कारीटातील बिया काही जण जिभेला लावतात तर काही जण डोक्याला लावतात. यामागे अशी भावना असते की दुष्ट शक्तीचा नाश करून जे जे वाईट आहे, कडू आहे ते नरकासुराच्या नावाने तोडून टाकावे आणि दिवाळीचा दीप उजळावा!
कारीट फोडण्याची ही एक मजा मालवणी मुलखात मोठी आहे. कारीट फोडून दिवाळीला सुरुवात होते. काही गावांमध्ये अभ्यंगस्नानापूर्वी तुळशीवृंदावनासमोर जात कारीट फोडले जाते. तर काही गावांमध्ये अभ्यंगस्नानानंतर कारीट फोडण्याची परंपरा आहे. कोकणातल्या प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावन हे असतेच. (अलीकडे शहरी भागात फ्लॅट संस्कृतीच्या जमान्यात तुळशी वृंदावनासाठी जागा मर्यादित असली तरी ही परंपरा जपली जातेच.) मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असो, घरासमोर तुळशी वृंदावन नाही असे होणार नाही, ही कोकणची खासियत आहे. या तुळशी वृंदावनासमोरच दिवाळीचा मुहूर्त होतो. एकदा का कारीट फोडून झाले की नवे कपडे परिधान करून मोठय़ांचा आशीर्वाद घेत देवासमोर नतमस्तक होऊन गोड पोहे खाण्याची परंपरा आहे.
नरकासुराच्या प्रतिकात्मक दहनासाठी कारीटाचाच का वापर केला गेला? या मागचे विज्ञान आणि परंपरा लक्षात घेताना पूर्वजांनी धोरणात्मक जपलेल्या परंपरा आश्चर्यचकित करणा-या वाटतात. ही संस्कृती टिकविताना त्यांनी पंचमहाभुतांचा गांभीर्याने विचार केला होता, याची जाणीव होते. आजच्या पिढीला याचे भान नसले तरीही परंपरेमुळे का होईना त्यांचे आरोग्य दिवाळीच्या मुहूर्तावर अधिक सुदृढ होते हे मात्र नक्की..
अमृत प्रहरी उठणे हे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जाते. या प्रहरात केलेले कोणतेही काम अधिक प्रभावशाली होत असल्याचे संशोधनातही स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर दिवाळीची सुरुवात पहाटे पहाटे करताना अभ्यंगस्नानाबरोबर दिवाळीच्या ऊबदार थंडीत कारीटाचा गंध नाकापर्यंत पोहोचणे म्हणजे आयुर्वेदीकदृष्टय़ा महत्त्वाचे मानले जाते. रक्ताभिसरणाची क्रिया या गंधामुळे तीव्र होत असल्याचे आयुर्वेद तज्ज्ञांचे मत आहे. कारीट हे असे एक फळ आहे की जे एकदा वेलीपासून तोडून ठेवले तर ते वर्षभर टिकते आणि आज तोडून ठेवलेले कारीट आपण पुढच्या दिवाळीलाही वापरू शकतो. तांदळाच्या कोंडय़ात न फोडता ठेवलेले कारीट जसे आहे तसे राहते. लोखंड अथवा कोणत्याही शस्त्राने जखम होऊन आपल्या शरीरावर सूज आली असेल तर कारीट फोडून लावल्यास सूज कमी होते. ग्रामीण भागात आता हातापायाच्या नखांना कोर झाली असेल तर कारटात बोट घुसवले जाते. यामुळे कोर तर बरी होतेच आणि जखमही भरते.
असे बहुपयोगी कारीट सहसा फोडून टाकल्याशिवाय ते मरून जात नाही. ते फळ वेलीवरून तोडले तरी जसे आहे तसेच राहते. जणू काही नरकासुराची वृत्तीही तशीच.जे जे वाईट आहे ते ते साध्या-साध्या उपायांनी बाजूला होणार नाही. ते चिरडून, तोडून, मोडून टाकायला हवे तर त्याचा अंश नाहीसा होईल. सर्वाधिक कडू असलेल्या या फळाचे यासाठी पूर्वजांनी निवड केली असावी, असे वाटते.
दिवाळी सणात अभ्यंगस्नानाचे फील गावाकडे अधिक असते. नरक चतुर्दशी दिवशी पहाटे लवकर उठून उटणे लावून गरम पाण्याने खोब-याच्या रसातील उटणे लावताना त्यानंतर मिळणारी सातविनाची साल..आणि त्याचे आयुर्वेदिक स्थान कमालीचे आहे. कारटाची मजा तर त्याहून जास्तच..कारीट फोडावे तेही डाव्यापायाच्या अंगठय़ाने. यासाठी घराघरांतून शर्यती लावल्या जातात. अंगठय़ाने कारीट फोडण्य़ाचे कौशल्य असते. ते कारीट फोडल्यानंतर त्यातील बी जीभेला लावायची आणि आपल्या माथ्याला. कारीटाचे बी जीभेला लावल्यानंतर तोंड कडू होते.
केवळ दिवाळीत कारीट फोडताना एक परंपरा म्हणून कारटाकडे न पाहता त्यामागची भावना समजून घ्यायला हवी आणि आपल्यातले दुर्गणही बाजूला सारायला हवेत. आमच्या मुलखात चावदिवसादिवशी या कारीटाला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व आता शहरातही त्याला येऊ लागले आहे. यामुळेच राना-वनात वेलींवर पडून असणा-या कारटांना दिवाळीच्या दिवशी फोडण्यासाठी म्हणून मोठी किंमत आली आहे...
No comments:
Post a Comment