चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथे (दि. २१) भर दिवसा दोन अज्ञात भामट्यांनी १ लाख २० हजार रुपयांची सोन्याची चेन हातोहात लांबवली. याबाबतची फिर्याद फसवणूक झालेले सदानंद सिद्धराम कांबळे (वय 72, रा. रवळनाथ गल्ली चंदगड) यांनी स्वतः चंदगड पोलिसात दिली.
चंदगड पोलिसातून याबाबतची मिळालेली अधिक माहिती अशी, आज दुपारी सव्वा बारा वाजता आपला मुलगा दिगंबर कांबळे यांच्या संभाजी चौक चंदगड येथील जिल्हा संघाच्या ऑफिस जवळ असलेल्या माटेश्वर पान शॉप येथे फिर्यादी सदानंद कांबळे गेले होते. याचवेळी हे दोन इसम ग्राहक म्हणून आले होते. त्यांनी पानपट्टीतून सिगरेट व चॉकलेट घेतले. याचे बिल 20 रुपये त्यांनी फिर्यादी यांना देताना त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चेनला ती विस रुपयाची नोट लावली. ही चेन तुम्ही रवळनाथ देवाला द्या असे म्हणून गळ्यातून काढायला लावली व आपल्या हातातील वीस रुपयाच्या नोटेत गुंडाळून ती पानपट्टी दुकानच्या गल्ल्याचा ड्रॉवर ओढून त्यात टाकली अर्थात टाकण्याचा बहाना केला व निघून गेले. दोन्ही भामटे गेल्यानंतर ड्राव्हर पाहतात तो वीस रुपयाच्या घडीत चेन नव्हती. यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कांबळे यांनी चंदगड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन झाला प्रकार सांगितला. यावरून पोलिसांनी तात्काळ भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318 (4) प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल देसाई करत आहेत.
No comments:
Post a Comment