चंदगड तालुक्यातील तिघांना 'गोवा बुक ऑफ रेकॉर्ड'चे आदर्श पुरस्कार, गोवा राज्यातील मंत्र्यांच्या हस्ते रविवारी होणार वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

29 November 2024

चंदगड तालुक्यातील तिघांना 'गोवा बुक ऑफ रेकॉर्ड'चे आदर्श पुरस्कार, गोवा राज्यातील मंत्र्यांच्या हस्ते रविवारी होणार वितरण

 

संपत पाटील              शंकर कोले      परशराम गायकवाड

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

  गोवा बुक ऑफ रेकॉर्ड (इंडिया) तसेच एशियन आर्ट लिटरेचर सोसायटी यांच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना दरवर्षी आदर्श पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदा हा मानाचा पुरस्कार चंदगड तालुक्यातील तिघांना जाहीर झाला आहे. 

   पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न डिजिटल मीडियाचे चंदगड तालुका अध्यक्ष तसेच चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी. एल. न्यूज चॅनेलचे संपादक व दैनिक दिनमानचे चंदगड तालुका प्रतिनिधी पत्रकार संपत रामाना पाटील, नांदवडे (सध्या रा. चंदगड) यांना 'महाराष्ट्र ॲचीवर्स सोशल अवॉर्ड' जाहीर झाला आहे. याशिवाय दक्ष कलेक्शन कोवाड कापड दुकानचे मालक परशराम कृष्णा गायकवाड यांना 'भारत बिजनेस अवॉर्ड' तर कालकुंद्री (ता चंदगड) येथील माजी तंटामुक्त कमिटी अध्यक्ष, माजी सैनिक व मराठा सेवा संघाचे चंदगड तालुका संघटक हवालदार शंकर दत्तू कोले यांना 'नॅशनल प्रेस्टीज अवार्ड' यांचा समावेश आहे.

   पुरस्कारांचे वितरण रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ११ वाजता आर्ट अँड कल्चर डिपार्टमेंट, संस्कृती भवन, पणजी- गोवा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून गोवा राज्याचे जलसंपदामंत्री व सहकार मंत्री सुभाष शिरोडकर, गोवा विधानसभा अध्यक्ष रमेश तावाडकर, माजी केंद्रीय कायदामंत्री ॲड. रमाकांत खलप, गोव्याचे माजी शिक्षण मंत्री प्रकाश वेळीप, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कावळेकर, चिंबेल गावचे सरपंच संदेश शिरोडकर, गोवा येथील प्रसिद्ध गजल गायक अजय नाईक, उद्योजक दिनेश उघडे (मुरबाड) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. प्रोफेसर बी. एन. खरात (संस्थापक अध्यक्ष गोवा बुक ऑफ रेकॉर्ड) यांनी केले आहे.

    या निवडी बद्दल तिन्ही पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे चंदगड तालुक्याच्या विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment