परशुराम पाटील यांचा मुंबई येथे सत्कार करताना मान्यवर. |
मुंबई : सी एल वृत्तसेवा
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याप्रकरणी 'अभिजात मराठी भाषा समिती'चे सदस्य आणि मराठी भाषा संचालनालयाचे माजी संचालक परशुराम पाटील यांचा विशेष सत्कार मुंबई येथील नरेवाडी विकास मंडळ आणि धनलक्ष्मी पतसंस्था यांच्या वतीने लोअर परेल मुंबई येथील बीडीडी चाळ मधील बुद्ध विहार हॉलमध्ये करण्यात आला.
यावेळी बार कौन्सिलचे सदस्य सुभाष घाडगे, धनलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष हरिश्चंद्र गोविळकर, उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांच्यासह शंकर पवार, बाळकृष्ण कदम, अधिवक्ता दीपक निलवे, संजय रणदिवे, विक्रम कोकितकर इत्यादी पदाधिकारी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मुंबई निवासी मराठी भाषाप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते. पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्याविषयीचा प्रस्ताव केंद्रशासनाकडे पाठवण्यासाठी मराठी भाषातज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या काही बैठकांना उपस्थित राहून परशुराम पाटील यांनी मार्गदर्शन केले होते.
सत्काराला उत्तर देताना परशुराम पाटील म्हणाले अभिजात भाषेच्या दर्जामुळे मराठीचे सबळीकरण होईल. मराठीतील प्राचीन वाङ्मयाचा अन्य भाषेत अनुवाद होईल. मराठी भाषेत संशोधन करणाऱ्यांना 'स्कॉलरशिप' दिली जाईल. महाराष्ट्रातील विविध बोलीभाषांचा अभ्यास आणि संशोधन होईल. महाराष्ट्रातील १२ सहस्र ग्रंथालयांचे सशक्तीकरण करण्यासाठी अनुदान दिले जाईल. भारतातील ४५० विद्यापिठांमध्ये मराठी भाषेचे अध्ययन केले जाईल. व्यवसाय मिळवून देणारी 'अर्थार्जनाची भाषा' आणि उच्च शिक्षण देणारी 'ज्ञानभाषा' असा मराठीचा विकास होऊ शकेल.
No comments:
Post a Comment