खडी उखडल्यामुळे कोवाड ते कागणी रस्त्याची झालेली दुरावस्था |
कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वाधिक वर्दळ असलेल्या कोवाड ते कागणी रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे या मार्गावरील अपघातांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. या रस्त्याचे तात्काळ डांबरी पॅचवर्क करावे अशी मागणी होत आहे.
नेसरी, कोवाड ते बेळगाव या राज्य मार्गावर कोवाड ते कागणी या सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यापूर्वी असलेल्या केवळ दोन-तीन खड्ड्यांची संख्या दोन तीनशे पर्यंत पोचली आहे. येथील खड्ड्यांचे पॅचवर्क वेळेत केले असते तर ही खड्ड्यांची मालिका तयार झाली नसती. गेल्या काही दिवसांत येथे पडलेल्या खड्ड्यांनी रौद्ररूप धारण केले आहे. उखडलेल्या खडी मध्ये अनेक दुचाकी स्लीप होऊन रोज अपघात घडत आहेत. तर जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दुचाकी सह चार चाकी वाहनांचे नुकसान होत आहे. या मार्गावरील खड्ड्यात अपघात होऊन यापूर्वी किमान तीन-चार जणांनी आपले प्राण गमावले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. इतर हजारो वाहनांसोबतच येथून आजरा- बेळगाव, गडहिंग्लज- बेळगाव, नेसरी- बेळगाव, चंदगड- राजगोळी, चंदगड- कुदनूर, चंदगड, कालकुंद्री- बेळगाव, कोल्हापूर- कोवाड अशा किमान ६० ते ७० बस फेऱ्या होतात. त्यात आता साखर कारखाना हंगाम सुरू झाल्यामुळे ऊस भरलेल्या ट्रॅक्टर की संख्या वाढली आहे खड्ड्यातून जाताना अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे संबंधित बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळत आहे. हीच अवस्था कोवाड पासून तेऊरवाडी ते गडहिंग्लज तालुका हद्दीपर्यंतच्या रस्त्याची झाली आहे. परिणामी प्रवासी व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून तात्काळ डांबरी पॅचवर्क करावे व पावसाळ्यापूर्वी रस्ता पूर्ण नवीन करावा अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment