कर्तव्यदक्ष अधिकारी, दिलदार स्वभावाचा खंदा सैनिक, 'सुभेदार मेजर गजानन चव्हाण' यांच्या १ जानेवारी रोजी होणाऱ्या सेवापूर्ती गौरव समारंभ निमित्त...... - चंदगड लाईव्ह न्युज

30 December 2024

कर्तव्यदक्ष अधिकारी, दिलदार स्वभावाचा खंदा सैनिक, 'सुभेदार मेजर गजानन चव्हाण' यांच्या १ जानेवारी रोजी होणाऱ्या सेवापूर्ती गौरव समारंभ निमित्त......

 

सुभेदार मेजर गजानन गोविंद चव्हाण

चंदगड : श्रीकांत पाटील (अध्यक्ष चंदगड ता. पत्रकार संघ) 

    दिलदार व्यक्ती, दानशूर व रुबाबदार व्यक्तिमत्व, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस, लढाऊ सैनिक व सैनिकांच्या गळ्यातील ताईत, ठरलेला देश सेवेचा वारसा लाभलेला, संवेदनशील मनाचा, कर्तव्यदक्ष 'आपला अधिकारी' म्हणजे  सुभेदार मेजर गजानन गोविंद चव्हाण. बेळगाव कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील कणगला गावचे ते सुपुत्र असून सध्या त्यांचे वास्तव्य निपाणी येथे आहे. ते भारतीय सेनादलातील 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छा देण्यासाठी 'सेवापूर्ती गौरव समारंभ' बुधवार दि. 1 जानेवारी 2025 रोजी निपाणी, ता. चिकोडी, जि. बेळगाव (कर्नाटक) येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त त्यांच्या विषयी थोडेसे...


  भारतीय सैन्यातील 7 मराठा लाईट इन्फंट्री मधून सुभेदार मेजर या पदावरून 31 डिसेंबर 2024 रोजी गजानन चव्हाण सेवानिवृत्त झाले. त्यांच्या अधिकारांतर्गत येणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबांचा प्रमुख म्हणून त्यांनी आपल्या अधिकार पदाचा वापर केला. म्हणूनच सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात त्यांच्याविषयी एक कुटुंब प्रमुख व मार्गदर्शक म्हणून आदराचे स्थान निर्माण झाले होते. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त '7 मराठा'चे जवान व त्यांचे कुटुंबीय हळहळले. कानपूर कॅम्प मधून बेळगाव कॅम्प कडे पाठवणी करताना या सर्वांच्या तोंडातून आपसूकच "आप जैसे सीनियर किस्मत से मिलते है! जैसे पतझड में मानो फुल खिलते है, आपके साथ कुछ लम्हे कई यादें बतौर इनाम मिली, एक सफर पर निकले और तजुर्बेकी सौगात मिली!" या काव्यपंक्ती उच्चारल्या गेल्या. कंपनीतील सैनिक व त्यांच्या कुटुंबियांनी उत्तर प्रदेशातील कानपूर येथून साश्रू नयनांनी बेळगाव कॅम्प ला पाठवणी केली. असा आदर व आपुलकी शासकीय सेवेतील  अधिकाऱ्यांच्या वाट्याला केवळ दुर्मिळ...!
   कानपूर व त्याआधी अनेक ठिकाणी अधिकारी म्हणून काम करत असताना सैनिक व त्यांच्या कुटुंबांचा सांभाळ, जवानांच्या समस्यांचे निराकरण, सर्वांशी आदराची वागणूक, परस्पर समन्वय, मतभेदाच्या प्रसंगी वेळीच सामंजस्याच्या उपायोजना, कामांचे योग्य नियोजन, दूरदृष्टी, जवानांसाठी वेल्फेअर व मनोरंजनासाठी कार्यक्रमांचे आयोजन यामुळे ते सर्वांना हवेहवेसे वाटत.
   सुभेदार मेजर चव्हाण यांना हा वारसा त्यांचे स्वातंत्र्यसैनिक वडील कै गोविंद चव्हाण यांच्याकडून मिळाला. स्वतंत्रता सेनानी म्हणून ब्रिटिश काळात तब्बल चार लढाया लढलेले गोविंद मामा दीर्घायुषी ठरले होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी 58 वर्षे पेन्शनचा उपभोग घेणारे ते एकमेव स्वातंत्र्य सैनिक असावेत. गजानन यांना एक भाऊ तर पाच बहिणी आहेत. गजानन यांचे बंधू रवींद्र चव्हाण हे सुद्धा 12 मराठा लाईट इन्फंट्री मध्ये कार्यरत आहेत. विशेष म्हणजे दोघेही एकाच वेळी प्रमोशनने सुभेदार मेजर बनले. असा योगायोग भारतीय आर्मीच्या इतिहासात दुर्मिळच.
   सुभेदार मेजर गजानन चव्हाण हे सन 1991 मध्ये भारतीय आर्मीत 34 वर्षांपूर्वी शिपाई म्हणून 'सात मराठा लाईट इन्फंट्री'त भरती झाले. शिपाई ते उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कालपर्यंत 34 वर्षांच्या  तेजोमय सेवेत अनेक खडतर आव्हानांचा सामना करत देशाच्या कानाकोपऱ्यात सेवा बजावली. या काळात त्यांनी देशातील दार्जिलिंग पुंछ (जम्मू-काश्मीर), अंदमान निकोबार बेटे, बटालिक (कारगिल), दिल्ली, उरी, सातारा एनसीसी कॅम्प, गांधीनगर (गुजरात), तवांग (अरुणाचल प्रदेश), जामनगर (गुजरात), सुरतगड (राजस्थान), नौशेरा (जम्मू- काश्मीर), कानपूर (उत्तर प्रदेश) व शेवटचा एक महिना बेळगाव येथे आपली सेवा बजावली. यापैकी 18 महिने कानपूर येथे सुभेदार मेजर म्हणून केलेले कार्य प्रत्येक आर्मी जवानाच्या स्मरणात राहील असेच होते.
     आपल्या सेवा काळात संयुक्त राष्ट्र शांती सेनेच्या माध्यमातून त्यांना 18 महिने दक्षिण आफ्रिकेतील कांगो गणराज्य येथे सेवा करावी लागली. दक्षिण आफ्रिकेत गेल्यानंतर त्यांचे स्वागत कांगो मधील न्यायरागोंगो ज्वालामुखीच्या उद्रेकाने केले. ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या धगधगत्या लाव्हा रसात तेथील चराचर होरपळून निघत होते. जवळच्य शहरातील घरे व त्यात राहणारी माणसे, प्राणी व निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी झाली. या आपत्कालीन परिस्थितीत सात मराठा च्या जवानांनी सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली केलेले मदत कार्य अतुलनीय होते. या मदत कार्यामुळे भारतीय सेनेबद्दल कांगो देशातील जनतेत आदराचे स्थान निर्माण केले. यापूर्वी कांगो येथील स्थानिक लोकशाहीतील बारा देशांच्या सैनिकांना शिवीगाळ करणे त्यांच्या गाड्यांवर लपून छपून दगडफेक करण्याचे प्रकार करत पण चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील मदत कार्यामुळे शांतिसेनेकडे पाहण्याचा तेथील लोकांच्या दृष्टिकोनात अमुलाग्र बदल झाला. याच काळात युगांडा व रवांडा समर्थित एम 23 रेबेल आरमार ग्रुप ने केलेल्या हल्ल्याला शांती सेनेतील भारतीय जवानांनी सडेतोड उत्तर देऊन पराक्रम गाजवला होता. यामुळे त्यांना संयुक्त राष्ट्र संघाकडून खास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
    सुभेदार मेजर चव्हाण यांनी आर्मीतील खडतर सेवेत 19 हजार फूट उंच बर्फाळ पर्वतरांगांमध्ये मायनस सेल्सिअस तापमान, बर्फवृष्टी, पाऊस, कडाक्याची थंडी, कठीण भूभाग अशा परिस्थितीचा सामना करत अनेक ऑपरेशन मध्ये सक्रिय सहभाग घेऊन ती यशस्वी करत देशाचे व 'सात मराठा लाईट इन्फंट्री' चे नाव अत्युच्च शिखरावर पोचवण्यात मोलाचा वाटा उचलला. 34 वर्षांच्या या खडतर सैनिकी प्रवासात त्यांच्या सौभाग्यवती कविता, दोन्ही चिरंजीव अभिनव व अक्षय तसेच कुटुंबियांची मोलाची साथ लाभली. तर आई कृष्णाबाई व वडील स्वातंत्र्यसैनिक गोविंद चव्हाण यांचे आशीर्वाद कारणीभूत ठरले.


  त्यांच्या मंगलमय सेवापुर्ती सन्मान सोहळ्यानिमित्त चंदगड तालुका पत्रकार संघातील सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्याकडून उर्वरित आरोग्यसंपन्न देदीप्यमान आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा...! व त्यांनी सैन्यात बजावलेल्या सेवेला मनःपूर्वक शतशः सलाम...!

काही दिवसांपूर्वी सेवन मराठाचे करेकुंडी (ता. चंदगड) गावचे निवृत्त जवान विजय शेनोळकर यांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना समजताच संवेदनशील मनाचे सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांनी कानपूर येथून करेकुंडी येथे येऊन विजय शेनोळकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी सेवन मराठाचे चंदगड तालुक्यातील माजी सैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment