एसटी सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करताना सरपंच संघटनेचे सदस्य व परिसरातील ग्रामस्थ (संग्रहित छायाचित्र) चंदगड : सी एल वृत्तसेवा |
कोल्हापूर व बेळगाव जिल्हा परिसरातून सिंधुदुर्ग व गोव्यात जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग असलेल्या तिलारी घाटातून गेले सहा महिने एस टी बससेवा बंद आहे. ही वाहतूक पूर्ववत सुरू करावी अशा आशयाचे पत्र जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी नुकतेच राज्य परिवहन महामंडळ विभाग नियंत्रक कोल्हापूर यांना दि १२ रोजी दिले आहे. पत्र देऊन तीन-चार दिवस झाले तरी अद्याप लालपरी घाटातून सुरू झाली नाही. उर्वरित सोपस्कार पूर्ण करून मंगळवार पर्यंत बस सेवा सुरू न झाल्यास बुधवार दि. १८ रोजी दोडामार्ग व चंदगड तालुक्यातील नागरिकांना घेऊन तिलारी नगर येथे रास्ता रोको करण्याचा इशारा सरपंच सेवा संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रविण गवस यांनी दिला आहे.
तिलारी घाटात पावसाळ्यात दरडी कोसळणे, रस्ता खचणे अशा घटना लक्षात घेऊन अवजड वाहनांसह एस टी बसेस बंद केल्या. पण अवजड वाहने सुरू आणि बससेवा मात्र बंद असे चित्र पावसाळ्यात व आजही पहायला मिळत आहे. यामुळे सामान्य नागरिक व प्रवाशांचे हाल सुरू आहेत. प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी, रुग्ण व त्यांचे नातेवाईक, चाकरमानी, शेतमजूर यांना गेल्या सहा महिन्यात मोठा आर्थिक फटका व मनस्ताप सहन करावा लागला आहे.
कठडा तुटलेल्या ठिकाणी दगड भरलेले बॅरेल ठेवले. बाजुला माती भराव टाकून रस्ता वाढवला आहे. येथून एसटी पेक्षा अवजड वाहने आज सुरू आहेत. मग एसटी का सुरू नाही? असा सवाल प्रविण गवस यांनी केला.
कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी घातलेली बंदीची मुदत ३१ ऑक्टोबर रोजी संपली. त्यानंतर दीड महिना उशिरा का असेना जिल्हाधिकारी यांनी बस सुरू करण्याबाबत नवा आदेश निर्गमित केला. तथापि पीडब्ल्यूडी व एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून एसटी सुरू करण्याबाबत कोणत्याच हालचाली दृष्टीपथात नसल्याचा आरोप करत गवस यांनी कोल्हापूर, चंदगड, राधानगरी, सावंतवाडी, आगाराने मंगळवार पर्यंत पूर्ववत बस फेऱ्या सुरू न केल्यास बुधवारी तिलारीनगर येथे रास्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे. यामुळे होणाऱ्या परिणामास बीडब्ल्यूडी व एस टी चे अधिकारी जबाबदार राहतील, असे म्हटले आहे.
No comments:
Post a Comment